स्थानिकांच्या रोजगारात भर ; व्यावसायिकांमध्ये समाधान

 

 

 

माथेरान : माथेरान अंतर्गत वाहतुकीची गहन समस्या ई रिक्षाच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असून स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने ई रिक्षा ही स्थानिकांसह पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. माथेरानला ई रिक्षा सुरू झाल्याची चर्चा सर्वदूर पसरल्याने आता पावसाळ्यात सुध्दा पर्यटकांची तोबा गर्दी पहावयास मिळत असून सर्वांनाच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.कधी नव्हे एवढी प्रचंड गर्दी यंदाच्या पावसाळ्यात तसेच शनिवारी आणि रविवारी त्याचप्रमाणे मधल्या काळात सुध्दा ई रिक्षा साठी पर्यटकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत तर तिन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांना,शिक्षकांना त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी वर्गाला ने आण करण्यासाठी अत्यंत माफक दरात ही सेवा उपलब्ध होत असल्याने मागील काळात ज्यांनी ज्यांनी ह्या सेवेला ताकदीनिशी विरोध दर्शविला होता त्यांनी सुध्दा या ई रिक्षाचाच स्वीकार करून आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी ई रिक्षाचे पास काढून दिले आहेत.त्यामुळे सर्वांनी ई रिक्षाचा स्वीकार केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेकदा रुग्णांसाठी नगरपरिषदेची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी ह्याच सेवेचा अधिक लाभ सर्वानाच होत आहे.

मुख्यत्वे नेहमीच भेडसावत असणारी वाहतुकीची समस्या ह्या सेवेच्या माध्यमातून मार्गी लागल्याने कुणी पर्यटक आपल्या बालगोपाल सह मिनीट्रेनच्या शटल मधून आनंद घेत आहेत तर हौशी पर्यटक घोड्यावर रपेट मारताना दिसत आहेत. वृद्ध, अपंग, जेष्ठ नागरिक,पर्यटक ,शालेय विद्यार्थी ई रिक्षाच्या सेवेचा मोठया प्रमाणावर लाभ घेत आहेत.

कोट

तीनही शाळेतील विद्यार्थ्यांची पायपीट ई रिक्षामुळे क्षमली असून आम्ही शालेय विद्यार्थ्यांना प्रथमतः प्राधान्य दिले असून विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर जाता येत असल्याने अभ्यासक्रमात मुलांची प्रगती होताना दिसून येत आहे.

शैलेश भोसले —ई रिक्षा चालक माथेरान

कोट

खरोखरच ई रिक्षामुळे आमचा प्रवास मस्त झाला असून दस्तुरी पासून गावात येण्यासाठी वेळ लागत नाही. रिक्षांची संख्या कमी असल्यामुळे आम्हाला वाट पहावी लागली होती. ही सुविधा चांगली झाली आहे. लवकरच ई रिक्षाच्या संख्येत वाढ झाली तर सर्वांना जलदगतीने प्रवास करता येईल.

जीनेंद्र भावके —-पर्यटक मुंबई

कोट

शनिवार सुट्टी असल्याने आम्ही सहकुटुंब येथे फिरावयास आलो. आमचे आईवडील वृद्ध असल्यामुळे त्यांना माथेरान स्टेशन भागापर्यंत आरामात यायला मिळाले. माथेरान साठी ई रिक्षा हा वाहतुकीसाठी चांगला उपक्रम राबविला जात आहे.

महिपत जोगी—पर्यटक मुंबई

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *