महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनची मागणी

 

 

ठाणे : ठाणे महानगर पालिकेत सध्या सर्वच विभागांमध्ये प्रभारी अधिकाऱ्यांची चलती निर्माण झाली आहे. लिपीकांना थेट सहाय्यक आयुक्त ते उपायुक्तपदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. त्यातून ठाणे महानगर पालिकेचे नुकसानच होत आहे. त्यामुळे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पदावर आणून त्यांच्याकडून अतिरिक्त वेतनाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी केली आहे. या मागणीसाठी ते स्वातंत्र्य दिनी उपोषणाला बसणार आहेत.
महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी या संदर्भात ठामपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियमचे उदाहरण दिले असून या ठिकाणी नियुक्त असलेल्या अधिकारी लिपीक या संवर्गातील आहेत. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांना ही बढती दिली आहे, असा आरोप केला आहे. ठामपातील अनेक अधिकारी हे लिपीक असून त्यांना सहाय्यक आयुक्त तसेच प्रभारी उपायुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यातून ठाणे महानगर पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, स्पर्धा परीक्षा न देता हे अधिकारी मोक्याच्या जागांवर बसलेले असल्याने धोरणात्मक निर्णय घेणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी ठाणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय होत असल्याने त्या प्रभारींना मूळ पदावर आणावे. अन्यथा, येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा शिंदे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *