राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी
राजीव चंदने
मुरबाड : राज्यभरात गाजलेल्या “झोळी” प्रकरणाचे रोहित पवार यांनी ट्विट केले होते.त्या अनुषंगाने मुरबाड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिपक वाघचौडे आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुरबाड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून त्यास सर्वस्वी जबाबदार हे तालुका आरोग्य अधिकारी आहेत. असा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची या तालुक्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
मागील तीन महिन्यांपुर्वी तुळई प्राथमिक आरोग्य केंद्रात कागदोपत्री श्रेणी अ वर्गाच्या निवासी डॉक्टर असूनही ते निवासी नसल्याने एका शिक्षकाचा उपचारा अभावी बळी गेला.
म्हसा यात्रेदरम्यान म्हाडस या एकाच गावात डेंग्यूचे पन्नास पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते. याच कालावधीत देवपे व सासणे येथे प्रत्येकी एक बालमृत्यू झाले होते.हे प्रकरण खुप गंभीर असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
धसई जवळील ओजिवले कातकरी वाडीतील महिलेला दि.23 जून रोजी रात्रभर डॉक्टर निवासी नसल्याने प्रसूती वेदना सहन कराव्या लागल्या.डॉक्टर दुसऱ्या दिवशी आल्याने तिची 24 रोजी प्रसूती झाली.
मुळात माहेरघर नावाची योजना सुरू असताना ऐन प्रसूतीवेळी गर्भवतींना रुग्णालयात दाखल होण्याची गरज का पडते?
मुरबाड तालुक्यात आजमितीस माहेरघर योजनेचा एकही लाभार्थी नाही.या माहेरघर योजनेवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होत असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.यास सर्वस्वी तालुका आरोग्य अधिकारी जबाबदार आहेत. वैशाखरे प्रधानपाडा येथील दोन वर्षाच्या बालकाला सर्पदंश झाला.त्या बालकाला टोकावडे ग्रामीण रुग्णालयात आणले.मोरोशी येथील गट अ वर्गाच्या डॉक्टर तेथे निवासी नसतात हे परिसरात सर्वश्रुत आहे.त्यामुळे या बालकाला टोकावडे येथे नेले.आणि त्याचा जीव गेला.
जांभूर्डे येथील गर्भवतीला म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्र असताना याठिकाणी डॉक्टर निवासी नसल्याने मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आणले.येथेही हे बाळ दगावले.
सार्वजनिक आरोग्यसेवेची पुरती वाट तालुका आरोग्य अधिकारी यांनी लावल्याने तालुक्यात दररोज बळी जात आहेत.याचमुळे तालुक्यात दररोज नव्याने खासगी हॉस्पिटल निर्माण होत आहेत.हे सार्वजनिक शासकीय आरोग्य सेवेचे अपयश आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कारभारावर तसेच याठिकाणी निवासी डॉक्टर नसल्या कारणाने तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.
याला सर्वस्वी जबाबदार हे तालुका आरोग्य अधिकारी आहेत.असा आरोप त्यांनी बनसोडे यांच्यावर या निवेदनात करण्यात आला आहे.मुरबाडच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून या बाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.त्यामुळे या एकूण कारभाराची काय चौकशी होते,व कुणावर काय कारवाई होते याकडे मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.दरम्यान कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिपक वाघचौडे यांनी दिला आहे.
०००००
