केतन खेडेकर

 

 

ठाणे : दिनांक ९ जुलै, २०२३ रोजी श्रीमती प्रज्ञा रोहन केदारे – लोखंडे हिचा मोहम्मद अली रोड, मुंबई येथील नूर या धर्मदाय रुग्णालयात प्रसुतीनंतर डॉ. मासूमा मर्चंट व नूर रूग्णालयातील कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याबाबत मृत महिलेचा भाऊ श्री. तुषार श्रीधर लोखंडे यांनी दिनांक १० जुलै, २०२३ रोजी पायधुनी पोलिस ठाणे येथे तक्रार केली होती तसेच महाराष्ट्र राज्‍य वैदकीय परिषद, वैदकीय अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका व महिला आयोगास देखील तक्रार दिली होती.  या विषयाबाबत भायखळा येथील स्थानिक आमदार  यामिनी यशवंत जाधव यांनी पावसाळी अधिवेशन, २०२३ मध्ये दिनांक २१ जुलै, २०२३ रोजी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून  देवेंद्र फडणवीस, गृहमत्री, महाराष्ट्र राज्य यांचे लक्ष वेधले होते. सदर लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहमंत्री यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय समिती घटीत करून  दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
सदर घटनेला दिनांक ९ जुलै, २०२४ रोजी एक वर्ष होत आहे. परंतु अजून मृत प्रज्ञा- केदारे लोखंडे हिचा फॉरेन्सिक रिपोर्ट अजून तयार नाही. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद येथे सूनावणी पार पाडली परंतू त्यातूनही मृत महिलेचा आई – वडीलांना आपल्या मुलीला न्याय मिळाला नाही. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परेल येथील वैद्यकीय विभागाने देखील डॉ. मासूमा मर्चंट यांना चौकशी करिता बोलविले होते. परंतू त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही.
मृत प्रज्ञा केदारे – लोखंडे हिचे  बाळ ( मुलगा ) एक वर्षाचा होत आला आहे. तो आई विना मोठा होत आहे. याची सल घेऊन प्रज्ञा केदारे  – लोखंडे हिचे आई – वडिल जगत आहेत. त्यांना प्रज्ञाच्या बाळाच्या भविष्याची चिंता सतावत आहे. नूर हॉस्पिटल प्रशासन , डॉ. मासूमा मर्चंट, बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्याकडून मृत महिलेच्या कुंटुबियांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही. याप्रकरणात लवकरात- लवकरात प्रज्ञा केदारे – लोखंडे यांच्या कुंटबियांना न्याय मिळो हीच अपेक्षा प्रशासनाकडून आहे. आज या घटनेला एक वर्ष झाले तरी अजूनही बाळ आणि मृत आईचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. जोपर्यंत मृत आईच्या कुटुंबीयांना आणि या बाळाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरवठा करत राहणार आणि बाळाला न्याय मिळवून देणार अशी माहिती आमदार यामिनी जाधव यांनी दिली.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *