न्यायालयाच्या आदेशानंतरही मंगल पब्लिसिटीच्या होर्डिगचा रहिवाश्यांना घोर
ठाणे : घाटकोपर येथील होर्डिग दुर्घटनेत १६ हुन अधिक बळी गेल्यानंतरही ठाणे महापालिका प्रशासनाचे डोळे उघडलेले दिसत नाहीत. ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलानजीकच्या सोसायटीच्या जागेत परवानगीविना उभारलेल्या होर्डिंगची टांगती तलवार कायम असल्याने रहिवाशी धास्तावले आहेत.
अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा उत्तुंग होर्डिंग कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. परवानगीचे सर्व निकष डावलून उभारलेला मंगल पब्लिसिटीचा हा उत्तुंग होर्डिग हटवण्याचे निर्देश न्यायालयानेही दिले होते. तरीही, कुठलीच कारवाई होत नसल्याने ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासन अ’मंगल’ होण्याची वाट पाहत आहेत का ? असा संतप्त सवाल सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, होर्डींगच्या मालकाचे ठामपा आणि पोलीसांशीही आर्थिक लागेबांधे असल्याने होर्डिगला अभय दिल्याचा आरोप रहिवाशी करीत आहेत. तेव्हा, हा अनधिकृत होर्डीग तत्काळ हटवुन संबधितांची लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी सोसायटीने निवेदनाद्वारे केली आहे.
ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलानजीकच्या सर्व्हीस रोडवर धर्मवीर आनंद दिघें यांच्या आशिर्वादाने उभारलेली आनंद कवच को. ऑप. हौसिंग सोसा. लि. शाहू नगर, सोसायटी आहे. या सोसायटीच्या जागेत राहूल शिर्के यांच्या मंगल पब्लिसीटीने ठाणे महापालिकेकडे खोटी कागदपत्रे सादर करून २०१८ साली ८० फुट x १०० फुट व ९० ते ९५ फुटांपेक्षा उंच असे दोन जाहीरात फलक उभारले आहेत. या अनधिकृत होर्डिग बाबत सोसायटीने स्थानिक नगरसेवक, प्रशासन तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. होर्डींगबाबत मुख्यमंत्र्याचे स्पष्ट निर्देश असताना देखील महापालिका अधिकाऱ्यांच्या पक्षपाती धोरणामुळे रहिवाशी आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या जाहीरात फलकाला लागून अनेक घरे असुन रहिवाश्यांची वहीवाट बंद झाल्यामुळे हे बेकायदा होर्डिग हटविण्यासाठी सोसायटीचा अविरत लढा सुरू आहे. परंतु, ठामपाचे अधिकारी काहीच दखल घेत नाहीत, एकप्रकारे मनमानी सुरू असल्याचा आरोप सोसायटीने केला आहे. मध्यंतरी ठामपाकडे अर्ज केला म्हणून राहुल शिर्के यांनी सोसायटीच्या रहिवाशांना नाहक त्रास देण्याकरीता ठाणे कोर्टात दावा दाखल केला. परंतु कोर्टानेही शिर्के विरोधात निर्णय देत होर्डीग उभारण्याचा कसलाही अधिकार नसल्याचा निकाल दि. ४ मार्च २०२४ रोजी दिला. ही बाब महापालिका व स्थानिक राबोडी पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणून देऊन देखील अद्यापपावेतो कुठलीही कारवाई केलेली नसल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.
मंगल पब्लिसीटीचा मालक राहुल शिर्के हा बेकायदा होर्डिगच्या माध्यमातून करोडो रूपये कमवित असून सोसायटीच्या जागेचा बेकायदेशीर वापर करीत आहे. रहिवाश्यांची वाट या होर्डिगमुळे अडली आहे. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी व स्थानिक पोलीस प्रशासनाशी त्याचे लागेबांधे असून आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय रहिवाशी व्यक्त करीत आहेत. तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत करण्याची मागणी सोसायटीने केली असुन न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहेत.