० भर सभेत ट्रम्पयांच्या हत्येचा प्रयत्न
० डोनाल्ड ट्रम्पयांच्यावर गोळीबार
० गोळी कानाला चाटून गेली
० हल्लेखोर ठार; ओळख पटली
० हल्यात ट्रम्पयांचा १ समर्थक ठार
न्यु यॉर्क : केवळ दैव बलवत्तर होते म्हणून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तथा आगामी निवडणुकीसाठी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प वाचले. भरसभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एक गोळी ड्रम्प यांच्या उजव्या कानाला लागून गेली. यामुळे ट्रम्प किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेन्सिलव्हॅनिया येथील एका सभेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे. सध्या डोनाल्ट ट्रम्प सुखरुप आहेत.
दरम्यान, सभेला आलेल्या एका श्रोत्याचा या गोळीबारात मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे हल्लेखोरही मारला गेला आहे.
सभेत गोळीबार झाल्याचे दिसताच सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांच्या बाजूने वर्तुळ केले. त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यात आले. सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वातावरण आहे. येथे राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ट्रम्प हे रिपब्लिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. याच कारणामुळे त्यांच्यावर झालेल्या या हल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर अमेरिकेचे विद्ममान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्या सभेदरम्यान झालेल्या घटनेची मी माहिती घेतली आहे. सुदैवाने ट्रम्प सुरक्षित असल्याचे मला समजले. ट्रम्प यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच या रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्वजण सुरक्षित असावेत यासाठी मी प्रार्थना करतो. अमेरिकेत अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेला स्थान नाही. एक देश म्हणून आपण एकत्र यायला हवे आणि अशा घटनांचा निषेध नोंदवायला हवा, असे बायडेन म्हणाले.
हल्ल्यानंतर काही वेळाने उठून उभे राहिल्यानंतर उपस्थितांनी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळाने ट्रम्प यांचा ताफा कार्यक्रमस्थळावरून निघून गेला. काही रिपोर्टनुसार, स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रम्प घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर लगेचच पोलिसांनी मैदान रिकामे करण्यास सुरुवात केली. युनायटेड स्टेट्स सेक्रेटरियल सर्व्हिसेसचे संचालक किम्बर्ली चीटल, होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी अलेजांद्रो मेयोर्कस आणि व्हाईट हाऊस होमलँड सुरक्षा सल्लागार लिझ शेरवुड रँडल यांच्याकडून जो बायडन यांना घटनेविषयी सांगण्यात आले.
दरम्यान, ट्रम्पचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या घृणास्पद कृत्यादरम्यान त्यांच्या जलद कारवाईबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पोलिसांना धन्यवाद दिले. ट्रम्प यांची प्रकृती ठीक आहे. स्थानिक पातळीवर ट्रम्प यांची तपासणी केली जात आहे. सीक्रेट सर्व्हिसने एका निवेदनात म्हटले आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष सुरक्षित आहेत. बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी सांगितले की, संशयित हल्लेखोर प्रत्युत्तरात मारला गेला. तर, सभेतील एकाचा मृत्यू झाला.
