संजय वाघुले यांच्या संस्थेतर्फे आयोजन
ठाणे : आषाढी एकादशीनिमित्ताने गडकरी रंगायतनमध्ये रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून ठाणेकरांना पंढरीच्या वारीची अनुभूती अनुभवता आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले व वृषाली वाघुले-भोसले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेने आयोजित केलेला ही संगीतमय वारी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेली.
भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील यांच्या हस्ते `भेटी लागी जीवा’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री विठ्ठलावरील विविध अभंग व गीते सादर करण्यात आली. गायिका मधुरा देशपांडे, अपर्णा हेगडे, गायक ओमकार प्रभुघाटे आणि डॉ. राम पंडित यांच्याकडून गीतांच्या माध्यमातून गडकरी रंगायतनमध्ये विठू नामाचा गजर झाला. अनुश्री फडणीस-देशपांडे यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले. ठाण्यात पावसाचा सरीनाम सुरू असताना, गडकरी रंगायतनमध्ये हरीनामामध्ये नागरिक तल्लीन झाले होते.
भेटी लागी जीवा, सुखाचेही सुख, अमृताहूनी गोड, अवघे गर्जे पंढरपूर, अबीर गुलाल, इंद्रायणीकाठी, कानडा राजा पंढरीचा तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी आदी गीत-अभंगांना वातावरण विठूमय झाले होते. मधुरा देशपांडे यांनी सादर केलेल्या `भाग्यदा लक्ष्मी बारम्मा:’ या कन्नड भक्तिगीताने रसिकांची मने जिंकली.
दरम्यान, विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि जनतेच्या हिताच्या उपक्रमांबद्दल आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी कौतुक केले. तसेच संस्थेला शुभेच्छा दिल्या.
00000
