भुजबळांच्या शरद पवार भेटीने खळबळ
स्वाती घोसाळकर
मुंबई : अवघा महाराष्ट्र पंढरपुरच्या वारीत लीन झाला आहे. आषाढी एकादशिला आता दोनच दिवस शिल्लक असल्याने अवघ्या महाराष्ट्रात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भेटी लागे जीवा लागलीशी आस असा आरव भक्तजन करीत आहेत… पण इकडे राजकारणात मात्र जो तो आपल्या विठ्ठलाच्या शोधात आहे. भेटी गाठी वाढू लागल्याने काहीजण भेटीने सुखावत आहेत तर काहींच्या या भेटी जीव्हारी लागत आहेत. अशातच आज अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीस गेल्याने राजकीय खळबळ उडाली होती.
मागील वेळेस अजित पवारांनी बंड केले त्यावेळी छगनभुजबळ हे शरद पवारांच्या भेटीस गेले होते. मी अजित पवारांना भेटतो. तेथील रागरंग भेटतो आणि तुम्हास सांगतो असे सांगून पवारंच्या येथून निघालेले छगन भुजबळ थेट अजित पवारांच्या पक्षातच दाखल झाले. बाळासाहेबांच्या शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर छगन भुजबळ निष्ठेन शरद पवारांसोबत राहीले होते. पवारंसोबत प्रथम काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीतही त्यांनी विविध महत्वाची पदे भुषविली. पण एनवेळी पवारांना सोडचिठ्ठी देत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामिल झाले. अशापरिस्थितीत छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीस गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
दरम्यान छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटेन, राहुल गांधींना देखील भेटेन असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर छगन भुजबळ पुन्हा स्वगृही येणार की छगन भुजबळ अजित पवारांचा काही निरोप घेऊन गेलेत? अशी चर्चा दुपारपर्यंत राजकीय वर्तुळात रंगली. मात्र, शरद पवारांना मी राजकीय विषयासंदर्भात भेटायला गेलो नव्हतो. राज्यात सध्या मराठा समाज ओबीसी समाजाच्या लोकांकडे जात नाही आणि ओबीसी समाजातील लोक मराठा समाजाच्या लोकांकडे जात नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे शरद पवारांसोबत या प्रश्नावर चर्चा केल्याचे भुजबळ म्हणाले.
भुजबळ तब्बल दीड तास वेटिंगवर
छगन भुजबळ सोमवारी १० वाजून २० मिनिटांनी सिल्वर ओक निवासस्थानी आले. त्यानंतर साधारणपणे सव्वा बारा वाजता सिल्वर ओक निवासस्थानातून बाहेर पडले. शरद पवार हे आजारी असल्यामुळे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता भुजबळ आल्यामुळे त्यांना तब्बल दीड तास वेटिंगवर थांबाव लागलं. मी पवारांची वेळ घेतली नव्हती त्यामुळे मला त्यांची वाट पाहत थांबाव लागलं. ते आजारी असल्यामुळे कुणालाच भेटत नाहीत, असं भुजबळ यांनी सांगितलं. शरद पवारांच्या कार्यालयाकडून भुजबळांना कोणतीही वेळ देण्यात आली नव्हती, असं स्पष्ट करण्यात आलं.
दरम्यान राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटले. छगन विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्यावतीने आरक्षणाच्या लढ्यात सत्ताधारी पक्षाला येत असलेल्या अपयशामुळे शरद पवारांना भागीदार करण्यासाठीचा हा डाव असल्याची टीका करण्यात आली तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील भुजबळ भेटीला जाणं म्हणजे सरकारचाच डाव असल्याचं म्हंटलं आहे
छगन भुजबळांनी मात्र आजच्या भेटीवर बोलताना शरद पवारांनी आरक्षणाच्या लढ्याबाबत लवकरच आपण एकत्रित बसून चर्चा करु असं आश्वासन दिल्याची माहिती दिली आहे. खऱं खोटे ज्याचा त्याचा विठ्ठल जाणो अशी प्रतिक्रीया राजकीय वर्तुळात रंगली होती.
