अशोक गायकवाड
नवी मुंबई :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र लाभार्थी महिलांनी नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: अर्ज करावा अथवा महानगरपालिकेने सुरु केलेल्या आपल्या नजिकच्या मदत कक्षाला भेट देऊन अर्ज दाखल करावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांनी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यादृष्टीने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याकरिता विविध माध्यमांतून योजनेची माहिती पात्र महिलांपर्यंत पोहचविण्यात येत आहे व त्यांच्याकडून योजनेचे अर्ज भरून घेण्याच्या कामास गती देण्यात येत आहे. या योजनेचे महिलांकडून उत्स्फुर्त स्वागत करण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह ८ विभाग कार्यालय क्षेत्रातील १११ प्रभागांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या मदत कक्षांना महिलांचा उत्साही प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सोबतच शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणा-या २२६ अंगणवाड्यांमध्येही तेथील अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे. आत्तापर्यंत ६ हजारहून अधिक महिलांनी अर्ज दाखल केले असून ३१ ऑगस्ट अर्ज भरण्याची मुदत आहे. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष दिले जात असून सर्व पात्र महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचली पाहिजे व एकही पात्र महिला लाभ घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरात मोक्याच्या ठिकाणी योजनेचे बॅनर्स प्रदर्शित करण्यात आले असून मोठे होर्डींग व डिजीटल होर्डींग याव्दारेही योजनेची माहिती प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच वर्तमानपत्रांसह फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू ट्यूब, व्हॉट्सॲप अशा समाज माध्यमांतूनही योजनेची माहिती सर्वदूर प्रसारित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कचरा संकलन करण्यासाठी शहरातील गल्लोगल्ली दररोज जाणा-या घंटागाड्यांवरही ध्वनीफितीव्दारे योजनेचा व्यापक प्रचार केला जात आहे आणि एनएमएमटी बसेसमधील ध्वनीक्षेपक यंत्रणेवरूनही योजनेची माहितीप्रद ध्वनीफित प्रसारित केली जात आहे.
यासोबतच समाजविकास विभागाकडील समुह संघटक आपापल्या नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांपर्यंत पोहचून त्यांना योजनेची माहिती देत आहेत व त्यांचे अर्जही भरून घेत आहेत तसेच त्यांच्यामार्फत त्या परिसरातील इतर महिलांपर्यंत पोहचून त्यांचेही अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. अशाच प्रकारे महानगरपालिकेच्या ४५० हून अधिक आशा वर्करही आपल्या कार्यक्षेत्रातील घरांपर्यंत पोहचून तेथील महिलांमध्ये योजनेविषयी जनजागृती करीत आहेत तसेच त्यामधील पात्र महिलांचे अर्जही भरून घेत आहेत. अशा विविध प्रकारे महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी नियोजनबध्द कार्यवाही करण्यात येत आहे.
या योजनेचे ऑनलाईन अर्ज ‘नारीशक्ती दूत’ ॲपवरुन भरले जात असून विहित नमुन्यात ऑफलाईन लेखी अर्जही दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पात्र महिलांना अर्ज भरणा करणे सोयीचे व्हावे याकरिता या मदत कक्षांची वेळ दोन सत्रात सकाळी ८ ते दुपारी २ तसेच दुपारी २ ते रात्री ८ अशी ठेवण्यात आलेली असून हे मदत कक्ष आठवड्यातील सर्व सातही दिवस म्हणजे शनिवार व रविवार या कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात आले आहेत. १७ जुलै रोजी मोहरम व आषाढी एकादशी या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मदत कक्ष सुरू असणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील एक अविवाहित महिला यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या सक्षम बँक खात्यात दरमहा रु. १५००/- इतकी रक्कम म्हणजेच दरवर्षी रू. १८ हजार रक्कम डिबीटीव्दारे प्राप्त होणार आहे. या योजनेच्या लाभासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून यासोबत जोडावयची कागदपत्रे अत्यंत सोपी व सहज उपलब्ध होतील अशी ठेवण्यात आलेली आहेत. सदर महिलेने आधारकार्ड सादर करावयाचे असून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही, तसेच पांढरे रेशनकार्ड असल्यास अथवा कोणतेही रेशनकार्ड नसल्यास वार्षिक उत्पन्न २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे अधिवास प्रमाणपत्र किंवा १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड किंवा १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्मदाखला यापैकी एक दाखला सादर करावयाचा आहे.इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरूषासोबत विवाह केला असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड किंवा १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्मदाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे.
योजनेचे अर्ज पात्र महिला ह्या स्वत: नारीशक्ती दूत ॲप / पोर्टलववरुन भरू शकतात अथवा नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या नजिकच्या मदत कक्षात अथवा अंगणवाडीमध्येही जाऊन भरू शकतात. अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून महानगरपालिकेने मदत कक्षावर २५० हून अधिक कर्मचा-यांची नेमणूक केलेली आहे. तसेच कक्षांठिकाणी आवश्यक बैठक व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या कक्षांना भेटी देऊन अनेक महिला योजनेची सविस्तर माहिती जाणून घेत आहेत तसेच पात्र महिला अर्ज दाखल करीत आहेत. महानगरपालिकेने सुरू केलेल्या सर्व मदत कक्षांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली असून https://www.nmmc.gov.in/navimumbai/-1720784542 या लिंकवर क्लिक करुन नागरिकांना आपल्या नजिकच्या मदत कक्षाचे स्थळ सहजपणे समजू शकते. तसेच https://www.google.com/maps/d/edit?mid=1ybuFRgqKUN,rsaa0PC3QcBDfa3ZWmY&usp=sharing या लिंकव्दारे गुगल नकाशासह उपलब्ध आहे. योजनेसाठी पात्र एकही महिला नोंदणी कक्षातून परत जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यापूर्वीच आढावा बैठकीत दिले असून अर्ज भरण्याची संपूर्ण कार्यवाही विनामूल्य होईल याची काटेकोर दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देशही दिले आहेत. त्यामुळे पात्र महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये व या योजनेची अंमलबजावणी पूर्णत: नि:शुल्क आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. योजनेविषयी कोणत्याही प्रकारच्या अधिक माहितीसाठी अथवा अडचण आल्यास निराकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने ९९६९००८०८८ / ९७०२३०९०५४ / ९३७२१०६९७६ हे मोबाईल क्रमांक जाहीर केले असून याशिवाय शासनाच्या महिला व बालविकास विभागाने १८१ हा टोल फ्री महिला हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे. त्यावर नागरिक सहज संपर्क साधू शकतात. तरी योजनेस पात्र लाभार्थी महिलांनी याची नोंद घेऊन नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: अर्ज करावा अथवा महानगरपालिकेने सुरु केलेल्या आपल्या नजिकच्या मदत कक्षाला भेट देऊन अर्ज दाखल करावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
00000
