अनिल ठाणेकर
ठाणे : प्लेझेंट पार्क सिग्नल ते सिल्वर पार्क सिग्नल पर्यंतचा उड्डाणपूल जवळपास पूर्ण झाला आहे. जवळपास १ किलोमीटरचा हा पूल आहे. साधारण १७.५ मीटर रुंदी आहे. तर रॅम्पची रुंदी १९. ५ मीटर इतकी आहे. या उड्डाणपुलाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून लाल रंगाची थीम येथे ठरविण्यात आली आहे. या उड्डाणपुलासाठी जवळपास ७५ कोटींचा खर्च झाला आहे. या उड्डाणपुलामुळे २ मोठे जंक्शन कव्हर झाले आहेत, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मीरा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील प्लेझेंट पार्क सिग्नल ते सिल्वर पार्क सिग्नल या नवीन उड्डाण पुलाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. डिव्हायडर , रिफ्लेक्टर , रंगकाम अशी काही कामे येत्या आठवडाभरात पूर्ण होतील. सध्या फिनिशिंगचे काम अंतिम टप्प्यात असून हा उड्डाणपूल आवश्यक ती सगळी कामे पूर्ण करून याच महिन्यात नागरिकांसाठी खुला केला जाईल , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली. मुंबई महानगरातील वरून मेट्रो, खाली उड्डाणपूल असा हा इंट्रीग्रेटेड पूल असून १ किलोमीटर लांबीचा आहे. मीरा भाईंदरच्या लाखो वाहन चालकांना याचा मोठा फायदा होणार आहे, असेही आमदार सरनाईक यांनी सांगितले. या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हावे अशी विनंती आमदार सरनाईक यांनी त्यांना केली आहे. मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसह या उड्डाणपुलावर जाऊन सगळी पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील, जे कुमार ईन्फ्राचे प्रोजेक्ट मॅनेजर सुब्रतोदास अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पण पावसाचा जोर असल्याने काही छोटी – मोठी कामे बाकी आहेत. दुभाजक , रिफ्लेक्ट्रर , रंगकाम अशी सर्व कामे येत्या आठवडाभरात पूर्ण करा , अशा सूचना आमदार सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना केल्या. मीरा भाईंदर मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ज्यावेळेस मीरा भाईंदर मेट्रोचे काम सुरु झाले त्याचवेळी भविष्याचा विचार करून डबलडेकर मार्ग असावा , वर मेट्रो व खाली जंक्शनवर उड्डाणपूल असावे अशी संकल्पना आमदार सरनाईक यांनी मांडून या मार्गावर ३ उड्डाणपुलाची मंजुरी आणली होती. त्यावेळच्या एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्यासह जानेवारी २०२० मध्ये आमदार सरनाईक यांनी प्रत्यक्ष या जंक्शनच्या ठिकाणी पाहणी करून उड्डाणपुलाची आवश्यकता पटवून दिली होती व एमएमआरडीए कडून ३ उड्डाणपूल – डबलडेकर मार्ग मंजूर केला होता. ३ ब्रिजसाठी २१७ कोटी निधी त्यावेळी मंजूर करण्यात आला होता.
मुंबई महानगरात हा पहिला मेट्रो इंट्रीग्रेटेड उड्डाणपूल आहे. वर मेट्रो , खाली उड्डाणपूल , आणि त्याखाली सध्याचा रस्ता अशा सुविधा येथे लोकांना मिळतील. मेट्रो मार्गाचे काम याठिकाणी आधी पूर्ण करण्यात आले. त्यानंतर या उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले. जवळपास दीड वर्षात उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आमदार सरनाईक यांना यावेळी दिली. या मार्गावर ३ उड्डाणपुलापैकी १ पूर्ण झाला आहे. तर दुसऱ्या उड्डाणपुलाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण केले जाईल, असा शब्द अधिकाऱ्यांनी आमदार सरनाईक यांना यावेळी दिला.पुढील एका आठवड्यात उड्डाणपुलाची राहिलेली सगळी कामे पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे. एमएमआरडीएकडून मेट्रो व उड्डाणपुलाचे काम होत आहे. मुख्यमंत्री तसेच या खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण व्हावे अशी विनंती स्थानिक आमदार म्हणून मी व एमएमआरडीए अधिकाऱ्यांनीही माननीय मुख्यमंत्र्यांना केली असून लोकार्पण करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकरच लोकार्पणाची वेळ दिली तर त्यांच्याच हस्ते लोकार्पण होईल. पण जर वेळ मिळाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने याच महिन्यात उड्डाणपुलाचे काम पूर्ण होताच लोकार्पण करून उड्डाणपूल नागरिकांसाठी स्थानिक आमदार – खासदार – लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत खुला केला जाईल , असेही आमदार सरनाईक यांनी सांगितले. उड्डाणपुलावरील वाहन चालक , नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून राहिलेली सगळी कामे एका आठवड्यात पूर्ण केली जातील. याच महिन्यात हा उड्डाणपूल वाहनांसाठी कोणत्याही परिस्थितीत खुला होईल, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
00000
