भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची पोलिसांकडे तक्रार

 

 

 

ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन व नौपाडा परिसरात बोगस प्लेसमेंट कंपन्यांनी बेरोजगारांच्या फसवणुकीचा ट्रॅप लावला असून, दररोज शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींची किमान ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत फसवणूक केली जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी रेल्वे स्टेशनच्या परिसरात फलक लावून तरुणांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. तसेच नौपाडा पोलिसांना कठोर कारवाईची विनंती केली आहे.

ठाणे रेल्वे स्थानक व नौपाड्यातील काही इमारतींमध्ये अनेक बोगस कंपन्यांनी तात्पुरती कार्यालये थाटली आहेत. त्यात मोठ्या संख्येने ठाणे शहराबाहेरील तरुण-तरुणी येत आहेत. त्यांना बड्या बॅंका, मोठी हॉटेल आणि मोठ्या कंपन्यांची नावे सांगून नोकरीचे मृगजळ उभे केले जाते. त्यानंतर त्यांच्याकडून नोंदणी शुल्क किंवा डिपॉझिट म्हणून ३ ते ५ हजार रुपये उकळले जातात. मात्र, नोकरी देण्यासाठी टोलवाटोलवी केली जाते. तर काही वेळा तरुणाने बॅंकेत लिपिकाच्या नोकरीला पसंती दिली असल्यास, सुरक्षा रक्षकाची किंवा हेल्परची नोकरी दिली जाते. शिपाई पदाची नोकरी हवी असल्यास सफाई कामगार म्हणून नोकरी दिली जाते. मात्र, काही कंपन्यांच्या एच. आर. अधिकाऱ्यांबरोबर संधान बांधून तरुण-तरुणींना मानसिक त्रास व कष्टाचे काम करून घेतले जाते. या प्रकाराला कंटाळून मुले नोकरी सोडून निघून जातात. ते परत पैसे मागण्यासाठी आल्यानंतर नोकरी दिली असल्याचे सांगितले जाते. अन्यथा, बाऊन्सर्सकडून दमबाजी केली जात आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गंभीर दखल घेऊन बोगस प्लेसमेंट कंपन्या बंद कराव्यात, अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केली आहे. तसेच या प्रकाराची कामगार विभागानेही दखल घेऊन फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करावी, अशी मागणी श्री. वाघुले यांनी केली आहे.

 

चौकट

फसवणुकीचे असे जाळे

दुकाने व आस्थापना कायद्यातून कामगार खात्याकडे ऑनलाईन नोंदणी, रेल्वे स्टेशन व मोक्याच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय, बड्या कंपन्या, मोठी हॉटेल व प्रसिद्ध कंपनीत नोकरीची ऑफर, नोकरीच्या बदल्यात कमिशन किंवा पहिला पगार देण्याची अट, काही कंपन्यांकडून तीन ते ५ हजार रुपयांची डिपॉझिट, स्थानिक शहरातील तरुण-तरुणींऐवजी बाहेरच्या शहरातील तरुणांना नोंदणीसाठी फोन, ठाणे जिल्ह्यातील तरुण-तरुणींची पश्चिम उपनगरात जोगेश्वरी-अंधेरीला मुलाखत व नोकरीची ऑफर, काही कंपन्यांमधील एच आर अधिकाऱ्यांबरोबर संधान साधून तात्पुरती नोकरी. नाईट शिफ्ट किंवा उशीरापर्यंत काम करण्याची सक्ती, नोकरी नाकारल्यास नोंदणी शुल्क परत देण्यास नकार, बॅंकेत नोकरीची इच्छा असलेल्या सुरक्षा रक्षकाची ऑफऱ, शिपाईसाठी इच्छूकांना सफाई कामगाराची ऑफर, नोकरीच्या ठिकाणी मानसिक छळ, प्लेसमेंट कंपनीत पैसे मागण्यासाठी येणाऱ्या तरुण-तरुणांना बाऊन्सर्सकडून धमक्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *