पालक मुग गिळून गप्प ; जिल्हाधिकार्यांचा आदेश पायदळी तुडवून अतिवृष्टीत शाळा सुरू !
माथेरान : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार दि.२१ जुलै रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट इशारा देण्यात आला असून रायगड जिल्ह्यामध्ये सद्य स्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. याकामी रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगडचे किशन जावळे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्रमांक दि. ०२/०८/२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये किशन जावळे यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार त्यांनी जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यातील सर्व शाळा माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, अंगणवाडी, सरकारी व खाजगी,प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित विनाअनुदानित शाळा सर्व महाविद्यालये, आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र तसेच आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दि. 22 रोजी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुट्टी जाहीर केलेली असून तथापि या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार कामकाज करावे असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार माथेरान मधील नगरपालिका शाळा, अंगणवाडी या दि.२२ जुलै रोजी बंद ठेवण्यात आल्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवून येथील सेंट झेवियर शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळा सुरू ठेवली. गावापासून दूरवर असणाऱ्या तीन ते चार किलोमीटर या शाळेत लहान लहान केजीच्या मुलांना भर पावसात शाळेत जाणे भाग पडले. माथेरान मध्ये अतिवृष्टीत झाडे कोसळण्याची दाट शक्यता असते.प्रिन्सिपल सिसिलिया आणि काही शिक्षक हे याच शाळेत मुक्कामी असतात त्यांना पावसाच्या अतिवृष्टीमुळे,मुलांच्या सुरक्षेबाबत काहीएक स्वारस्य दिसत नाही. काही शिक्षक हे उन्हाळ्यात तसेच भर पावसात सुध्दा परिसरातून घाटरस्त्यातुन येत असतात.प्रिन्सिपल सिसिलिया
यांना याबाबत फोनवरून संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला परंतु त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. काही पालकांना सुद्धा याबाबत विचारणा केली असता आपल्या मुलांना शाळेतून काढून टाकतील मुलांवर शिक्षक दडपण आणतील या भीतीपोटी कोणीही काही बोलण्यास तयार नाहीत.
शासनाच्या अधिकृत प्राथमिक शाळा मोफत उपलब्ध आहेत.उत्तम प्रकारे मराठी शाळेत शिक्षण दिले जात असताना देखील काही पालक केवळ आपल्या मुलाने चारचौघात फाडफाड इंग्रजी बोलणे आवश्यक आहे हे एक खूळ डोक्यात ठेवून अनेकांची फी भरण्याची सुद्धा ऐपत नसताना सेंट झेवियर या खाजगी शाळेत मुलांना दाखल करत आहेत.काही अशिक्षित पालकांकडून मुलींना मराठी शाळेत तर मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देण्याचा दुजाभाव सुध्दा इथे पहावयास मिळतो.आजवर या इंग्रजी शाळेतील अनेक विद्यार्थी दहावीनंतर इथेच मोलमजुरी करून जीवन कंठीत आहेत तर ठराविकच मुले पुढील शिक्षणासाठी अन्य ठिकाणी जात आहेत.
00000
