ठाणे : रोहा येथील बेक कंपनीतील ॲग्रीमेंटवर सही करताना २० कंत्राटी कामगारांना कायम केले जाणार आहे. कोरस कंपनीतील काही कंत्राटी कामगार कायम होणार आहेत. व्यवस्थापन, कामगार व युनियन यांच्या सामंजस्याने हे शक्य झाले आहे, अशी माहिती टेक्स्टाईल कामगार सभा, जनरल मजदूर सभा व हिंद मजदूर सभा, महाराष्ट्र कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी दिली आहे.
कामगार नेते संजय वढावकर यांच्या अभीष्टचिंतनाच्या निमित्ताने टेक्स्टाईल कामगार सभा, जनरल मजदूर सभा व हिंद मजदूर सभा या युनियनच्या कामगारांनी आयोजित मेळाव्यात संजय वढावकर बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी टेक्स्टाईल कामगार सभा व जनरल मजदूर सभा या युनियनच्या अध्यक्षा संज्योत वढावकर या होत्या. याप्रसंगी सभेचे उपाध्यक्ष शामकांत जोशी, सेक्रेटरी जगदीश उपाध्याय, खजिनदार प्रशांत शेट्ये, संघटक सचिव सुहास खरीवले, कायदेविषयक सल्लागार अश्विनी राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
कामगारांचे प्रेम आहे, युनियनबद्दल आदर आहे, आम्ही जे कामगारांसाठी काम करतो त्या कामाचे हे फळ आहे की स्वतःचा वेळ, पैसा खर्च करुन कामगार सदिच्छा देण्यासाठी उपस्थित झाले आहेत. यातुन आम्हाला काम करण्याची नवीन उर्जा मिळते. मालक आणि व्यवस्थापनाची भूमिका, सरकारी व इतर विभागातून न मिळणारे सहकार्य यातुन उभे राहण्यासाठी कामगारांना त्यांची संघटना व मानसिक बल, संघर्षाची प्रेरणा या सगळ्या सकारात्मक बाबी घेऊनच आपण आपल्या न्याय्य हक्कासाठी लढत असतो. मालकाशी लढणे म्हणजे मालकाच्या विरुद्ध वैयक्तिक लढाई नसते तर कंपनीच्या उन्नतीसाठी दिवस रात्र मेहनत करणारा प्रमुख घटक हा कामगार असतो हे मालकवर्गाला दाखवून द्यावे लागते. मालकवर्गाला असे वाटते मी मशीनरीवर गुंतवणूक केली आहे त्यामुळे माझे उत्पादन सुरु आहे आणि मी नफा कमावतो आहे. पण नफा कामगारांमुळेच होते हे वेळोवेळी आपल्या एकजुटीने आणि ताकदीने दाखवावे लागते. हे आपण सामंजस्याने, सातत्याने दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत. मी आजारी असताना माझ्या विनंतीवरून व्यवस्थापन व कामगार कमिटीने हाॅस्पिटलमध्ये येऊन कोरस कंपनीच्या ॲग्रीमेंटवर सह्या केल्या. आजारपणामुळे कामगारांचे नुकसान होऊ नये ही त्यामागील भावना होती. तर रोहा येथील बेक कंपनीतील ॲग्रीमेंटवर सही करताना २० कंत्राटी कामगारांना कायम केले जाणार आहे. कोरस कंपनीतील काही कंत्राटी कामगार कायम होणार आहेत. व्यवस्थापन, कामगार व युनियन यांच्या सामंजस्याने हे शक्य झाले आहे, असे मत टेक्स्टाईल कामगार सभा, जनरल मजदूर सभा व हिंद मजदूर सभा, महाराष्ट्र कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी व्यक्त केले आहे.
युनियन म्हणजे आमचे कुटूंब आहे. ट्रेनिंग देताना आम्ही नेहमी सांगतो, युनियन म्हणजे काय तर युनियन म्हणजे युनियनचे सभासद, कामगार म्हणजेच युनियन आहे. कामगार संघटनेची ताकद हे कामगार असतात. कामगार आहेत म्हणून आम्ही कामगारांसाठी भांडू शकतो. कामगारांचे प्रेम, मोठे साहेबांचे म्हणजे दिवंगत सूर्यकांत वढावकर साहेबाचे आशिर्वाद आहेत, यामुळे कामगारांसाठी काम करत राहण्याकरिता प्रोत्साहन मिळते. सरकारी उद्योगातील कामगारांना खूप सोयीसुविधा मिळतात पण छोट्या कारखान्यातील कामगारांना कंपनीत, बाऊन्सर-सीसीटीव्हीच्या देखरेखीत काम करावे लागते, अशा दहशतीत असलेल्या छोट्या कारखान्यातील कामगारांना संघटीत करून त्यांना कायदेशीर न्याय हक्क मिळवून देणे, कामगारांना निर्भय व सुरक्षित वातावरणात काम करण्याची व्यवस्था संघटनेच्या ताकदीवर कारखान्यात निर्माण केली, असे उद्गार टेक्स्टाईल कामगार सभा व जनरल मजदूर सभेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर यांनी काढले.
याप्रसंगी भगवान करंजे- कोरस इंडिया लिमिटेड, संतोष गुजर व सुधीर- स्विच गिअर्स ठाणे, स्मिता भुवड- जामसन इंडस्ट्रीज, रामचंद्र पवार- एलिषा लॉजिस्टिक, तुषार देशमुख-साॅल्वे, भरत कोतवाल- नीलिकॉन फूड अँड डाईस, सुरेश बामूगडे -एफ.डी.सी. कॉन्ट्रॅक्ट, हरेश्वर जाधव- एलिषा लॉजिस्टिक, श्रीकांत जंगम -विधी डायकेम, दिलीप सानप- दीपक नायट्रेट, मनीष साळवी -साॅल्वे आदी विविध कारखान्यातील कामगारांनीही आपली मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामकांत जोशी यांनी केले.
00000
