विचुंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ग्रामसेवकाचा अजब कारभार;
ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून महावितरणने केली लाईट बंद; तक्रारीनंतर पुन्हा केली जोडणी
राज भंडारी-
पनवेल : पनवेल तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीच्या अगदी समोरच असलेल्या गावठाण जागेतील घराचा नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाला अडसर होत असल्यामुळे १८ वर्षे कर भरणाऱ्या, तसेच सात बारा, ८ अ अशी रीतसर कागदपत्रे असतानाही ग्रामपंचायतीने चक्क करदाता असलेल्या घराला बेकायदेशीर असल्याचे भासवित वेळोवेळी नोटिसा पाठवून धमकवण्याचा प्रकार केला. एवढ्यावरच न थांबता मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बिना नंबर प्लेट असलेल्या जेसिबिने या घराला जमीनदोस्त केले. सदर घरामध्ये सध्या गावातील तरुणांचे एक पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथक आपले सामान ठेवत होते. बेकायदेशीर कारवाई करीत असताना या पथकाचे सर्वच सामान ग्रामपंचायतीने पावसात उघड्यावर अस्ताव्यस्त ठेवल्यामुळे गावातील हे तरुण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांविरोधात कायदेशीर लढाईसाठी मैदानात उतरले असल्याची माहिती पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकाचे अध्यक्ष उमेश बाळाराम दुंदरेकर यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विचुंबे ग्रामपंचायत हद्दीमध्ये झपाट्याने लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे येथील रहदारी, वाहनांचे प्रमाण देखील वाढले असल्यामुळे अनेक वर्षांपासून येथील गाढी नदीवर पर्यायी पुलाची उभारणी करण्याची मागणी होत होती. सदरची मागणी मान्य होऊन याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नव्याने पुल बांधण्यात आला. मात्र पुल पूर्णत्वास येत असतानाच या पुलाच्या मार्गावर येथील गावठाण जागेत असणाऱ्या घराचा अडसर सार्वजनिक बांधकाम विभागाला झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने या गावठाण भागातील घराला संपादित करणे गरजेचे होते, मात्र त्यांनी सदर घर खाली करून देण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला. गेली १८ वर्षे सर्व्हे नं २२८ मधील घर क्रं. २७९ हे नियमितपणे घरपट्टी भरत आले आहे. सन २००६ ते सन २०२५ पर्यंत या घराची घरपट्टी ग्रामपंचायत मध्ये जमा झालेली आहे. एका बाजूला ग्रामपंचायतने कर जमा करायचा आणि कोणा एकाच्या सांगण्यावरून सदर घर हे बेकायदेशीर ठरवायचे, हा दुट्टपीपणा ग्रामपंचायतने आपल्याच गावातील तरुणांसोबत केला असल्याचे सत्य देखील यावेळी समोर आणण्यात आले आहे.
विचुंबे येथील सर्व्हे नं. २२८ मधील घर क्र. २७९ या घराचा सातबारा हा गोवंड समस्त गावकरी म्हणून असून त्यावरील घर हे ८ अ च्या उताऱ्यानुसार पूर्णा मुजिकल स्टार तर्फे अध्यक्ष उमेश बाळाराम दुंदरेकर यांच्या नावाने ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे. ग्रामपंचायतीमार्फत याबाबतची घरपट्टी देखील याच नावाने दिली जाते. मात्र आपण गावचे सरपंच आहे म्हणून काहीही करू शकतो, ही भावना जवळ बाळगून ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा गैरवापर करून सदरची बेकायदेशीर कारवाई केली असल्याचा आरोप पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकाने केला आहे.
सदर बांधकाम बेकायदेशीर ठरविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत १४ वर्षे नोटिसा पाठविण्यात येत आहेत. त्यावर पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकामार्फत वकिलामार्फत त्यांना तसे उत्तर देण्यात आले आहेत. गेल्या १४ वर्षांत तब्बल ७ वेळा ग्रामपंचायतीने नोटिसा काढल्या आणि प्रत्येक वेळेला पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकाने वकिलामार्फत ग्रामपंचायतीला उत्तरे दिली. मात्र ग्रामपंचायतीचा कारभार हातात आलेल्या सरपंच आणि ग्रामसेवकासह सदस्यांनी हेतू पुरस्सर सदर घर हे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. याबाबत महावितरणला देखील खोटे पत्र लिहून तोडक करवाईपूर्वी मीटर काढण्यासाठी भाग पडल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. तसेच सदर प्रकार घडल्यानंतर घरमालक म्हणून उमेश बाळाराम दुंदरेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर महावितरण मार्फत तोडलेल्या घराशेजारी असलेल्या झाडावर पुन्हा मिटरची जोडणी करून आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला.
याबाबत पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकाने तोडक कारवाई दरम्यान शांत राहून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सायंकाळी त्यांनी आपले घर बेकायदेशीरपणे तोडले असल्याबाबत तक्रार खांदेश्वर पोलीसात देखील दाखल करण्यासाठी गेले असता खांदेश्वर पोलिसांनी मात्र सदर प्रकरण हे दिवाणी असल्यामुळे तक्रार घेण्यास नकार देत तसे लेखी देवून तक्रारदारांची रवानगी मागच्या पावलांनी धाडली. यावेळी पूर्णा मुजिकल स्टार बेंजो पथकाचे अध्यक्ष उमेश बाळाराम पाटील यांनी आपल्याला न्याय न मिळाल्यास आम्ही पथकाचे सर्व सदस्य आमरण उपोषण करणार असल्याचं इशारा दिला.तसेच या पथकाने सदर प्रकरण आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या विरोधात हे पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त, नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या समोर ठेवणार आणि न्याय मिळवणार असा इशारा सुद्धा दिला आहे.
0000
