मुंबई : पावसाने शहरांतील जनजीवन विस्कळित करण्याबरोबरच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. महाराष्ट्रातील पावसाच्या संकटात राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीला तत्परतेने उभे राहावे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे ओढवलेल्या संकटात राज्य आणि केंद्र सरकारने कुठलाही भेदभाव न करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे.
राज्यात काही दिवसांपासून पूर्व विदर्भ, पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र अशा दोन्ही सरकारला सतर्कता आणि मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
