दखल

प्रा. नंदकुमार काळे

पुणे, मुंबईतील हिट अँड प्रकरण असो की पूजा खेडकर आणि तिच्या मातापित्यांचे प्रताप असोत, तिन्ही उदाहरणे बेदरकार प्रवृत्ती आणि बेभान तरुणाईचे चित्र दाखवण्यास पुरेशी आहेत. खेरीज यातून ढासळत्या कुटुंबव्यवस्थेचे आणि कोसळणाऱ्या नीतीमत्तेचे दर्शन घडते. मुलांना पैसा किती पुरवायचा, कधी पुरवायचा, संस्कारांची शिदोरी कधी द्यायची याचे भान हरपलेल्या अनेक पालकांनी अशा घटनांकडे सजगतेने पहायला हवे.

सध्या महाराष्ट्रात ‌‘हिट अँड रन‌’ प्रकरणे गाजत आहेत. मद्य, सत्ता, यौवनाचा कैफ, आपली पत आणि खोटी प्रतिष्ठा दाखवून देण्याची खुमखुमी, श्रम न करता खिशात खुळखुळत असणारा पैसा अशा एक ना अनेक कारणांमुळे उन्मत्त झालेली तरुणाई जणू सगळे जग आपल्या पायाखाली असल्याच्या मस्तीत मोकाट सुटल्याचे चित्र आज दिसत आहे. अपघात हा अपघात असतो हे मान्य केले तरी त्यासाठी कोण कारणीभूत आहे, तो कोणाच्या कोणत्या चुकीमुळे झाला याचे विश्लेषण करणेही गरजेचे ठरते, कारण त्याखेरीज अशा घटना कमी करण्यासाठी उपाययोजना करणे अशक्य आहे. मात्र हे करताना समोर दिसणारे वा जाणवणारे वास्तव अत्यंत भयावह आहे, असेच म्हणावे लागेल.
सध्या राज्यात दोन दिवट्यांचे प्रताप आणि त्यांच्या कृष्णकृत्यांना असणारी पालकांची साथ हा विषय अनेक वादांना तोंड फोडून जाणारा आहे. यात पैशाची, सत्तेची मस्ती उघडपणे दिसत आहे. त्याला आता पूजा खेडकर प्रकरणाचीही जोड मिळाल्यामुळे विषयाचे गांभीर्य शतपटीने वाढले आहे. पुणे पोर्शे कार प्रकरण, वरळी हिट अँड रन आणि ताज्या पूजा खेडकर प्रकरणातील साम्य सांगायचे झाल्यास या तीनही ‌‘बाळां‌’ना पैशाने लाडावून ठेवले आहे. त्यांना पैसा, सत्ता आणि अधिकारांची मस्ती चढली आहे. दोन दिवटे आणि एक दिवटी कोणत्या थराला जातात आणि आपण काहीही केले तरी कोणी काहीच वाकडे करू शकणार नाही, हा मस्तवालपणा या मुलांमध्ये आला कुठून असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. हा मस्तवालपणा, कायदा झुगारण्याची वृत्ती अनुवंशिक आहे की काय, असा प्रश्न पडावा असे या तीन उदाहरणांमधून वाटू लागते. या प्रकरणांमध्ये मुले दोषी आहेत यात कोणताही वाद नाही; परंतु त्यांच्यापेक्षा अधिक दोष पालकांचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. वेदांत अग्रवाल, मिहीर शहा आणि पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे मुलांच्या गंभीर गुन्ह्यानंतरचे वर्तन पाहिले तर आपण जगापेक्षा कुणीतरी वेगळे आहोत, कोणताही कायदे आपल्याला लागू होत नाही, पैसा- सत्ता- संपत्तीच्या बळावर आपण काहीही करू शकतो, ही मिजासखोरी भूमिका त्यांच्या वर्तनातून दिसते. मग मुलेही त्यांच्या पायावर पाऊल ठेवत तशीच वागतात. चरित्र चांगले असावे, काम शुद्ध भावनेने करावे. कुणाचेही वाईट होणार नाही याची काळजी घ्यावी हा चांगला विचार मनात येण्यासाठी तसे चांगले संस्कार होण्याची गरज असते. म्हणूनच बालपणापासून मनावर झालेले संस्कार अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे ठरतात. संत तुकाराम महाराज म्हणतात,
शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी॥
मुखी अमृताची वाणी। देह देवाचे कारणी॥
सर्वांग निर्मळ। चित्त जैसे गंगाजळ॥
तुका म्हणे जाती। ताप दर्शने विश्रांती॥
चांगली अपेक्षा कुणाकडून करावी? तर त्याचेही काही मापदंड ठरले आहेत. आंब्यांच्या झाडापासून मधुर फळांची अपेक्षा केली जाते. बाभळीचे झाड आयुष्यभर काटेच देते. म्हणजेच बीज लावले, तसे त्याला फळ येत असते. प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यातील ओळी नुसत्या गुणगुणण्यासाठी नसतात. त्या आचरणात आणण्यासाठी असतात. म्हणूनच ‌‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर‌’ असे केवळ म्हणून उपयोग नाही तर तो विचार मनात रुजवणे गरजेचे आहे. तसे वेळीच झाले असते तर ही धनिकांची बाळे वाया गेली नसती. मात्र दुर्दैवाने काही घरांमध्ये तसे घडताना दिसत नाही.
आज प्रशासकीय सेवेत मराठी मुले कमी आहेत. आता कुठे प्रशासकीय सेवेत मराठी युवक-युवतींचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पण असे असताना पूजा खेडकरसारखे प्रकार पुढे येत असतील, तर मुलांचे यशही झाकोळून जाते. डॉ. पूजाची बदली झाल्यानंतरच ती चर्चेत आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिने खोट्या प्रमाणपत्राद्वारे पद मिळवल्याचा प्रकार उघड झाला आणि चर्चेला तोंड फुटले. बहुविकलांग आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत त्या आधारे पूजा आयएएस झाली. खरे पाहता तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते; परंतु सहाही वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी तिने बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला. अर्थातच केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणा (कॅट) कडून बाहेरचा अहवाल नाकारला होता. पण नंतरच्या काही घडामोडींमध्ये तो अहवाल स्वीकारला गेला. आता पूजाची हुशारी किती हे व्हायरल झालेल्या क्लिपमधून समोर आले आहे. मुलाखतीमध्ये तिला महाराष्ट्राशी संबंधित दोन प्रश्न विचारले होते; परंतु त्याची उत्तरे देता आली नाहीत. ‌‘मॉक इंटरव्ह्यू‌’ मध्ये तिला बीड जिल्ह्यामध्ये महिलांच्या गर्भपिशवी काढून टाकण्यात आल्याच्या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा हे प्रकरण राज्यभरात नव्हे तर देशभरात गाजले होते. मात्र त्याबद्दल पूजाला काहीही माहीत नव्हते. असे असूनही तिची निवड झाली. यामुळे तिच्या नियुक्तीपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले.
सरकारी नोकरीत असतानाच पूजाने ‌‘पूजा ऑटो‌’ नावाची कंपनी स्थापन केली. दुसरी बाब म्हणजे पूजाने केंद्रीय नागरी सेवा आयोगाला सादर केलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांव्यतिरिक्त ‌‘ओबीसी नॉन क्रिमीलेयर‌’ प्रमाणपत्रातही काही विसंगती आढळली. आठ लाखांच्या आतील उत्पन्न असलेल्यांनाच ‌‘क्रिमी लेअर‌’चा फायदा मिळतो. मात्र प्रत्यक्षात वडीलांचे उत्पन्न 40 कोटींचे असतानाही तिने हा फायदा लाटला. तिच्या वडिलांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. खेरीज पूजा अनेकदा व्हीव्हीआयपी श्रेणीत मोडणाऱ्या मागण्यांसाठी चर्चेत राहिली. वैयक्तिक ऑडी कारवर लाल दिवा आणि व्हीआयपी नंबर प्लेट लावण्यापुरतेच तिचे गुन्हे मर्यादित नाहीत. ही यादी बरीच मोठी आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सामान्य प्रशासन विभागाला सादर केलेल्या अहवालानुसार तीन जून रोजी कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच पूजाने स्वतंत्र केबिन, कार, निवासी क्वार्टर आणि एक शिपाई देण्याची मागणी केली होती. प्रशिक्षणाच्या कालावधीत या सुविधांचा वापर करता येत नाही. असे असतानाही तिने दबाव निर्माण करत एका अधिकाऱ्याच्या दालनाचा ताबा घेतला. त्यातील फर्निचर बदलले. वैयक्तिक गाडीवर ‌‘महाराष्ट्र सरकार‌’ असा फलक लावला. मुख्य सचिव सुजाता सौमित्र यांच्या दालनातही ती दांडगाईने शिरली. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर तिला वाशिमला पाठवण्यात आले; परंतु दरम्यानच्या काळात पंतप्रधान कार्यालयानेच चौकशी सुरू केल्याने आता ती आयएएसपद राहते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे खेडकर कुटुंब मूळ पाथर्डी तालुक्यातील भालगावचे. या कुटुंबाचा पंकजा मुंडे यांच्याशी राजकीय संबंध आहे. तसेच या भागातील वनजमीन दांडगाईने कसत असल्याचा आरोपही या कुटुंबावर आहे. यासंदर्भात पोलीस चौकशीला गेल्यानंतर त्यांना दमदाटी करणे, वाहिन्यांच्या कॅमेऱ्यावर हल्ला करणे, मुळशी तसेच बारामतीमध्ये जमीन खरेदी प्रकरण, मुळशीतील शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण, तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवणे, बाऊन्सर घेऊन त्या परिसरात जाणे असे प्रकार पूजाच्या आईनेही केले आहेत. त्यामुळेच पालक असे असतील तर मुले कशी निपजणार? अगरवाल आणि खेडकर कुटुंबीयांची मुले याचे उत्तर आपल्या उत्तरातून देतात.
पूजाचेे वडील आणि आजोबा निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. अशी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाला खरे तर नियमांची माहिती असायला हवी. मात्र तेच नियम वाकवून ते अनाचार करत असल्यास ढासळत्या नितीमत्तेचे दर्शन घडते. पूजाच्या वडिलांवरही मुलीला सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप आहे. आता पंतप्रधान कार्यालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून पूजाच्या शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि पद मिळवण्यासाठी ‌‘ओबीसी‌’ कोट्यातील लाभांचा गैरवापर केला का, हे तपासण्यासाठी अहवाल मागवला आहे. याशिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‌‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी‌’ने या प्रकरणी महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागवला आहे. पूजाचे व्हॉट्स ॲप चॅट्सदेखील समोर आले आहेत. त्यात ती केबिन, प्रवास इत्यादींबाबत अपडेट्स विचारताना दिसत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. ही समिती पूजाच्या निवडीबाबत केलेले दावे आणि इतर तपशीलांची चौकशी करेल. यातून सत्य समोर येईलच. योग्य ती कारवाईही होईल. पण या सर्व प्रकरणातून समोर येणारी मुलांची तसेच त्यांच्या कुटुंबियांची बेदरकार मानसिकता कशी सुधारणार हा खरा प्रश्न आहे.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *