मोखाडा, ता. २८ : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि दरी डोंगरात वसलेल्या मोखाडा तालुक्यात १७ गावपाडे डोंगराच्या पायथ्याशी व माथ्यावर वसलेली आहेत. येथे दरडी कोसळण्याची भीती आहे. मुसळधार पावसाने मोखाड्यात माळीण आणि इर्शाळवाडीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी या १७ गावपाड्यांतील डोंगरपायथ्याशी, माथ्यावर आणि कपारीत वास्तव्यास असलेल्या सुमारे नऊ हजार नागरिकांचे सर्व्हेक्षण केले आहे. तसेच त्यांना तेथे न जाण्याच्या, दवंडीद्वारे, तसेच समाज माध्यमातून सूचित करण्याचे आदेश मोखाडा तहसीलदारांनी प्रशासनाला दिले आहेत.
जे नागरिक डोंगर पायथ्याला, माथ्यावर, तसेच कपारीत वास्तव्याला आहेत, त्यांची पाहणी करून त्यांना संभाव्य धोका टाळण्यासाठी येथे न जाण्याच्या खबरदारी घेण्यासाठी सूचित करण्यात यावे. तसेच तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलातरित करण्याची गरज असल्यास त्याची माहिती तहसीलदार कार्यालयाला देण्याचे आदेश मोखाडा तहसीलदार मयुर खेंगले यांनी गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना दिले आहेत.
मोखाडा तालुक्यात १३ महसुली गावांमधील विविध परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची, तसेच भूस्खलन होण्याची भीती आहे. सावर्डेतील ६९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलण्याचा इशारा देण्यात आला आहे. धामणशेत-बेहेटवाटीतील १,५३६, पळसपाड्यातील ४५०, गायमुखपाडा येथील ३००, रायपाडा ४००, पांडवलेणीचा भाग २००, आमले २६३, आंब्याची विहीर ३००, नाशेरा १०८०, बोरशेती ४००, बिवलपाडा, करोळी, कुडवा, ईकरीचापाडा १५००, चिकनपाडा, पांगरी १०००, पासोडीपाडा, वांगणपाडा ८५० अशा नागरिकांना निर्देश देण्यात आले आहे.
गतवर्षी घडलेल्या इर्शाळवाडीच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क आहे. मोखाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून डोंगर पायथ्याला, डोंगर माथ्यावर आंणि डोंगर कपारीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *