अनिल ठाणेकर

 

 

ठाणे : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकीपुर्वी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेली विकास कामे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने गुरुवारी १ ऑगस्ट, २०२४ रोजी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महागनरपालिकेच्या अधिकार्यांसमवेत पाहणी दौरा आयोजित केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानुसार मतदारसंघात विविध विकास कामे सुरू असून त्यापैकी घोडबंदर रोडवरील गायमुख येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्र. २ पुर्णत्वास आले असून तेथे घाट बांधण्यात आलेला आहे त्याचे उद्घाटन व टप्पा क्र. ३ चे देखील भुमिपूजन मा. मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तसेच मोघरपाडा येथील स्मशानभुमी सुशोभिकरण करून गॅस व डिझेलवर चालणारी शवदाहिणी बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर तेथे पाळीव प्राण्यांना दफन करण्याची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, मोघरपाडा व कासारवडवली तलावात म्युझिकल फाऊंटन बसविण्यात येणार असून अश्या एकूण ५ तलावांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच किसननगर येथील मातोश्री गंगुबाई शिंदे हॉस्पिटल आहे त्याचप्रमाणे नळपाडा येथे मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या नावाने १५० खाटांचे कॅशलेस हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर जेष्ठ समाजसेविका पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र देखील उभारण्यात येत आहे. मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी ५ तरण तलाव व ५ फुटबॉल टर्फचे काम चालू आहे. तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने उद्यानाचे काम चालू असून ३ ठिकाणी उद्यानाचे देखील काम सुरू आहे. उपवन घाटाच्या बाजूला धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने जिमखान्याचे काम चालू आहे. पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडले असल्यामुळे पाऊस थांबल्यावर लवकरच ते खड्डे बुजविण्यात येतील परंतू कायमस्वरूपी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
तसेच उपवन येथे घाट बांधण्यात आलेला असून या घाटाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. परंतू, तेथे दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात किंवा तेथे येणार्या तरूण-तरुणींकडून घाटाचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी उपवन घाटावर गोर-गरीबांचा देव म्हणून मंहती पुर्ण जगामध्ये आहे अशा विठ्ठलाची एक ६० फुटाची मुर्ती उभारण्यात येणार आहे त्यामुळे एक आगळे-वेगळे पंढरी सरोवर या उपवन घाटात होणार असल्यामुळे तेथे भावनिक वातावरण निर्माण होईल. या घाटाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव असल्यामुळे तसेच विठ्ठलाची मुर्ती असल्यामुळे परिसराचे पावित्र्य राखले जाऊन एका चांगल्या समाजाची जडणघडण होण्यास मदत होईल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची जी अपेक्षा होती, मागणी होती ती मागणी आम्ही पुर्ण करीत आहोत. यासाठी मा. मुख्यमंत्र्यांनी कोणतिही काटकसर न करता निधी उपलब्ध करून दिला. ही सर्व कामे पुढील २ ते ३ वर्षात पुर्ण होणार आहेत पण त्याचबरोबर जी कामे पुर्णत्वास आली आहेत त्यांचे लोकार्पण पुढील महिन्यामध्ये मा. मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. जेणेकरून नागरिकांना या सुविधांचा लाभ घेता येईल, असे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी सांगितले. हा पाहणी दौऱ्यासाठी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम, मोहन कलाल, कनिष्ठ अभियंता भिमराव गव्हाणे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *