ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असून, वाहतूक पोलिस व आरटीओच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. रेल्वे स्टेशनच्या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे दोन वर्षांपासून रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील असून, आता काही ठराविक रिक्षाचालकांकडून आकसापोटी राजकीय आरोप केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली आहे.
वागळे इस्टेट परिसरातून ठाणे रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या रिक्षाचालकांकडून अचानक संप पुकारण्यात आला. तसेच काही रिक्षाचालकांकडून संजय वाघुलेंविरोधात आरोप करण्यात आले. त्यासंदर्भात श्री. वाघुले यांनी पत्रकाद्वारे खुलासा केला आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातून मीटरऐवजी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शेअर रिक्षा सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता. मात्र, काही बेशिस्त रिक्षाचालकांकडून रिक्षा थांब्यावर दोन रिक्षांच्या रांगा लावल्या जातात. त्यातून रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना नेहमी वाहतूककोंडी होते. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने रिक्षा चालविणे, एका रिक्षात पाच प्रवासी भरणे असे नियमांचे उल्लंघन सर्रास होत आहे. काही ठराविक रिक्षाचालकांकडून आपल्याविरोधात राजकीय आकसापोटी आरोप केले जात आहेत, असा खुलासा श्री. वाघुले यांनी केला आहे.
आयटी कर्मचाऱ्यांसाठी टीएमटीच्या ३७ बस
वागळे इस्टेटमधील शेअर रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी अचानक संप पुकारल्यामुळे बी-केबिन येथून कामावर निघालेल्या आयटी कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या विनंतीनंतर टीएमटी प्रशासनाने ३७ जादा बस सोडल्यामुळे कर्मचाऱ्यांची सोय झाली. त्याबद्दल आयटी कर्मचाऱ्यांकडून संजय वाघुले यांचे आभार मानण्यात आले.
रिक्षाचालकांच्या संपाची माहिती मिळताच संजय वाघुले यांनी तातडीने महापालिका आयुक्त सौरभ राव व टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्याबरोबर संपर्क साधला. तसेच गावदेवी व बी-केबिन येथून जादा टीएमटी बससेवा सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार टीएमटी प्रशासनाने सकाळच्या सुमारास ३७ जादा बस सोडण्यात आल्या. त्यानंतर वागळे इस्टेटमधून सायंकाळीही जादा बस सोडण्याची संजय वाघुले यांनी प्रशासनाला विनंती केली. या वेळी भाजपाचे उपाध्यक्ष गौरव अंकोला, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत कळंबटे, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले, मुकेश काळे, जतीन राजानी आदी उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *