मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी आरएमएमएस सभागृह, परेल, मुंबई-१२ येथे होणार आहे. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने खेळविण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागाच्या सौजन्याने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १२० पुरस्कार दिले जाणार आहेत.
प्रत्येक वयोगटात किमान चार साखळी फेऱ्यांमधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. प्रत्येक वयोगटांतील पहिल्या १० मुलांना व पहिल्या ५ मुलींना बीओबी कपचा पुरस्कार दिला जाईल. सर्व सामने जिंकणाऱ्या लहान वयोगटातील विजेत्यास क्रीडाप्रेमी सुरेश आचरेकर स्मृती विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटसअॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे ७ ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा.
