ठाणे : सरळ सेवा भरती-२०२३ अंतर्गत अर्थ विभागात निवड झालेल्या उमेदवारांना ०१ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन केले.
अर्थ विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा १२ पद, वरिष्ठ सहाय्यक लेखा ०५ पद अशा एकूण १७ नव नियुक्त उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात आले आहे. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर तसेच अर्थ विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट – क सरळ सेवा भरती करण्यासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी विविध संवर्गातील २५५ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयबीपीएस या संस्थेद्वारे सदर परिक्षा घेण्यात आली असून काही संवर्गाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इतर उर्वरित संवर्गातील निकालामध्ये पात्र उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी सुरू असून लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील.
०००००
२ सप्टेंबरला नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन
नवी मुंबई : महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन 02 सप्टेंबरला होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये 19 ऑगस्टपर्यंत आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन पूरक कागदपत्रांसह सादर करावयाचा आहे.
सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवाविषयक- आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.
विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्लेगांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
००००००
