दिडशे कोटीच्या भारतीय संघाला फक्त तीन ऑलिम्पिक ब्राँझ मेडल…आणि त्या पाच कोटीच्या इवल्याशा केनीयालाही एक गोल्ड मेडलसह एकूण तीन मेडल मिळतायत… कशाला इतका जल्लोष करताय… एका भारतीय चाहत्याची पॅरिसमधिल ही प्रतिक्रीया… आकडेवारीत तो बिल्कुल चुकलेला नाही. चुकलाय तो त्याचा दृष्टीकोन. भारतीय खेळाडूंचे यश दुय्यम लेखताना त्याला जो ग्लास अर्धा रिकामा दिसला तो मला मात्र अर्धा भरलेला दिसला. जो कधीही पूर्ण भरू शकतो याचा विश्वास या पॅरिस ऑलिम्पिकने दिलाय.
भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी टोकीयो ऑलिम्पिकमध्ये होती. भारताने निरज चोप्राच्या एक गोल्ड मेडलसह एकूण सात मेडल जिंकली होती. यंदा भारताच्या खात्यात आतापर्यंत फक्त तीन मेडल जमा आहेत. तिन्ही शुटींगमध्ये मिळविलेली आहेत. याशिवाय हा लेख लिहेपर्यंत हॉकी तसेच कुस्तीत विग्नेश फोगट, ३००० मीटर अडथळा शर्यतीत अविनाश साबळे आणि भालाफेकीत नीरज चोप्रा यांनी मेडलची आशा कायम ठेवली आहे. पण यापलिकडे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये विक्रमी पाच वेळा भारत चौथ्याक्रमांकापर्यंत धडकला आहे. ऑलिम्पिक मेडलला जणू स्पर्श करून आलेत. हे पाच खेळाडू त्यांच्या त्यांच्या खेळात पहिल्यांदाच मेडलची मॅच खेळत होते हे विशेष.
बॅडमिंटनमध्ये लक्ष्यसेन आणि तिरंदाजीत धीरज व अंकिताच्या मिश्र जोडीने ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली होती. शुटींगमध्ये दोन ब्राँज मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरला एतिहासिक तिसरे मेडल जिंकण्यासाठी फक्त एक शॉट कमी पडला. शुटींगमध्येच आणखिन दोन क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू हे चौथ्या क्रमांकावर पोहचले होते. थोडक्यात सगळे जर मनासारके झाले असते तर आतापर्यंत ८ मेडल भारताच्या खाती असती आणि हॉकी, कुस्ती , ३००० मीटर स्टीपलचेस आणि भालाफेक अशा चार पदकांची आशा. म्हणजे तब्बल १२ मेडलचे आपण दावेदार होतो.
आता पुन्हा प्रश्न तोच दिडशे कोटीच्या भारतात फक्त ११ मेडल. तर त्यांना मला हेच सांगायचेय की टीका करणे खुप सोपे असते. पण हे जे मेडल विनर आहेत त्यातील बहुतांश खेळाडू त्यांच्या फक्त नैर्सगिक गुणवत्तेवर येथपर्यंत पोहचले आहे. भारतीय क्रीडा सिस्टीमचा त्यातील वाटा नगण्य असा आहे. आताशी कुठे भारतात क्रीडा संस्कृती रुजतेय. टेक्नॉलॉजीच्या बाबती आपण जगाच्या अजून खूप मागे आहोत. ललिता बाबर असो वा अविनाश साबळे हे खेळाडू धावण्याच्या खेळाकडे का वळले तर गावाकडे लहाणपणी त्यांच्या शाळा सहा ते सात किलोमीटर दूर असायच्या. शाळेला उशीर होऊ नये म्हणून शेताच्या बांधावरून उड्या मारत जाणाऱ्या या मुलांमध्ये धावणे ही गरीबीची गरज होती. त्यातून पुढे हे दोघेही अडथळ्यांच्या शर्यतीत नावारुपाला आले आणि ऑलिम्पिकच्या फायनलपर्यंत धडकलेत. एकदा मिल्खासिंग यांनी मला त्यांच्या यशाचे रहस्य सांगितले होते. ते म्हणाले होते… बेटा यह पेट की भूख हैं ना वो दौडना और जितना सिखाती है… अशा भुकेलेल्या पोटाचे अविनाश साबळे, ललिता बाबर, प्रवीण जाधव खेळाडूंची यादी कितीतरी वाढत जाईल. गरज आहे ती वेळीच त्यांना हुडकून त्यांच्यातील हूनर वाढवण्याचे आणि म्हणूनच भारताच्या कामगिरीचा हा ग्लास माझ्यासाठी तरी अर्धा भरलेला आहे… मला खात्री आहे तुम्हालाही तो भरलेलाच दिसत असणार….
