




स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या गद्दार आमदारांचा अखेर आज गेम ओव्हर करण्यात आला आहे. आगामी निवडणूकीसाठी त्यांचा उमेदवारांच्या यादीतून नाव वगळण्यात आले आहे. गद्दारी करणाऱ्या आमदारांना विधानसभेला तिकीट देऊ नका, असे आदेशच आज काँग्रेस हायकमांडने दिले आणि या आमदारांची नावेही समोर आलीत.
विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. यासाठीच काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक देखील झाली. काँग्रेस पक्षाकडून 5 आमदारांना विधानसभा निवडणुकीत पक्षाच तिकीट देऊ नका, असे काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना आदेश दिले आहेत. ज्या आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे त्या आमदारांच्या पाच मतदार संघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, असे देखील आदेश दिले आहेत.
गद्दार आमदारांच्या यादीत सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी,
हिरामन खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे यांचा समावेश आहे.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती. ही काँग्रेसची मतं अजित पवार यांच्या उमेदवाराला मिळाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते दिली होती. या 28 पैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे दिसून आले. काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली होती. यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचे म्हटले जात आहे.
