भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचा पुढाकार
ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला ठाण्यातील प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी आणि टीएमटीच्या वागळे इस्टेटकडे जाणाऱ्या बसची कायमस्वरुपी वाढ करण्याच्या मागणीसाठी आज या मोहिमेचे आयोजन केले होते. दरम्यान, बेशिस्त रिक्षाचालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वागळे इस्टेटमधील काही नेते व पदाधिकाऱ्यांनाही संजय वाघुले यांनी खडसावले.
संजय वाघुले यांच्या प्रयत्नाने १ ऑगस्टपासून टीएमटी च्या जादा बसेस बी-केबीन येथून सकाळी सुटत आहेत. मात्र, काही बेशिस्त रिक्षाचालकांनी सोमवारी अचानक संप करीत आडमुठी भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, टीएमटीच्या सोमवारी अवघ्या अडीच तासात ३५ ते ४० जादा फेऱ्यांमुळे आयटी कर्मचाऱ्यांना वेळेत कामात पोचता आले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासूनही जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे बी-केबीन नाक्यावर आज विशेष स्वाक्षरी मोहिम आयोजित केली होती. त्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेत भाजपाचे शहर उपाध्यक्ष गौरव अंकोला, प्रभाग अध्यक्ष रोहित गोसावी, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले, ज्ञानेश्वर अंदुरे, जगदीश मोहिते, वैशाली विधाते, सई कारुळकर, भक्ती मोहिते, कमल सावळे, भाग्यश्री मुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बेशिस्त रिक्षाचालकांच्या बाजूने बोलण्याचा काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आला. त्याची दखल घेऊन संजय वाघुले यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना खडसावले. तसेच बेशिस्त रिक्षाचालकांऐवजी सामान्य प्रवाशांच्या पाठिशी उभे राहण्याची मागणी केली.
दरम्यान, बी-केबिन येथे अवघ्या ७ शेअर रिक्षासाठीच्या स्टॅण्डच्या जागेवर सुमारे २०० रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा थांबा रद्द करावा. तसेच गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडोनाल्ड शॉपपर्यंत (पॅराडाईज सोसायटी) विरुद्ध दिशेने जाणारे व ओव्हरसीट घेणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले वाहतूक पोलिस उपायुक्त विनय राठोड व आरटीओचे सहायक अधिकारी प्रसाद नलावडे यांच्याकडे केली आहे.
