मुंबई : काही महिन्यांपूर्वी स्वत:च्या न्याय हक्कासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करुन लढा देणारी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिकच्या फायनलमधून बाद केले. वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला ऑलिंपिंक कमिटीकडून अपात्र घोषित करण्यात आले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलयांनीही पंतप्रधान मोदींवर निशाना साधलाय.
विनेश फोगाट यांचा परफॉर्मन्स गेले काही दिवस खूप चांगला होता, मग अचानक काय झाले. 50-100 ग्रॅम वजन कसे वाढले. जर ती जिंकून आली तर तिला काही दिवसांपूर्वी जी वागणूक मिळाली होती, तिने जे आंदोलन केले होते. ते आठवून आपल्या विरोधी लाट निर्माण होईल असे कोणाला वाटले का? त्यामागे काही षडयंत्र असू शकते का? याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत विनेश फोगाटच्या विजयानंतरही झालेल्या पराभवावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी है तो मुमकिन हैं असं म्हणतात, त्यांनी युक्रेन रशिया युद्ध रोखलं असं म्हणतात मग त्यांनी विनेशबाबत जे घडत आहे, ते रोखायला हवं, असंही जयंत पाटील यानी म्हटलं आहे. भारताच्या लेकीचा जिंकूनही पराभव झाल्याने संसदेतही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. तर, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन विनेशला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
