मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा निवड समितीने एकमताने ज्येष्ठ पत्रकार  श्री. रमेश झवर यांची निवड केली आहे.
प्रत्यक्ष आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक मराठा मध्ये काम केलेले श्री. झवर हे पन्नास वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. दैनिक मराठा ते दैनिक लोकसत्ता असा त्यांचा सलग प्रवास आहे.  या कालावधीत उपसंपादक, वार्ताहर, मुख्य उपसंपादक, वृत्त संपादक, सहसंपादक अशा पदांवर त्यांनी काम केले आहे. दैनिक लोकसत्ता मध्ये व्यापार उद्योग पुरवणी (कॉमर्स विभाग) व प्रादेशिक विभाग हेही त्यांनी समर्थपणे सांभाळले होते. संपादकीय पानावरील लेख, स्फुट तसेच लोकसत्ताचे अनेक अग्रलेखही त्यांनी लिहिले आहेत. निवडणुका, साहित्य संमेलने, देश विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे त्यांनी वृत्तांकन केले आहे.
वयाची ८० वर्षे पार केलेल्या झवर यांचे आजही समाज माध्यमांवर माहितीपूर्ण लिखाण चालू आहे. त्यांचा ब्लाॅग लोकप्रिय झाल्यावर rameshzawar.co.in ही स्वत:ची वेबसाईट त्यांनी सुरू केली. ह्या साईटलाही देश विदेशात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष म्हणूनही अनेक वर्षे ते कार्यरत होते.
श्री. झवर यांचे मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे अभिनंदन. निवड समितीने केलेल्या सहकार्याबद्दलही मुंबई मराठी पत्रकार संघ आभारी आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *