राजीव चंदने
मुरबाड : ठाणे जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षे अनुभवी पत्रकारितेतून आपल्या लिखाणाचा ठसा उमटविणारे अभ्यासू पत्रकार संजय रमाकांत बोरगे यांच्या आजवरच्या संघर्षाला यश आले असून त्यांची मुलगी नुकतीच परदेशातून डॉक्टर होऊन भारतात परतली आहे.
गेली सहा वर्षे पत्रकार बोरगे यांची थोरली मुलगी डॉ. प्रियंका संजय बोरगे ही रशिया येथे एम.बी.बी.एस पदवीचे वैद्यकीय शिक्षण घेत होती. तत्पूर्वी तिने इयत्ता सहावी ते बारावी असे सहा वर्षीय माध्यमिक-उच्च मध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय माहीम पालघर येथे पूर्ण करून एकंदरीत सुमारे बारा वर्षांचा एक शैक्षणिक तप या पदवी पर्यंत पोहचण्यासाठी खर्ची लावला आहे. दरम्यान, वडील संजय बोरगे व कुटुंबियांनी कठोर आर्थिक परिस्थितीचा सामना करून लेकीला डॉक्टर झालेलं पाहण्याचे स्वप्न वास्तवात आणले. बोरगे हे पत्रकारिते सोबत उदरनिर्वाहसाठी मुरबाड एमआयडीसीमधील टायगर स्टील कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत आहे. कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असतांना देखील प्रियंकाच्या शिक्षणात खंड पडू न दिल्याने आज बोरगे कुटुंबियांच्या संघर्षाचे सोनं झालेले पाहायला मिळत आहे.
त्यामुळे या कुटुंबियांच्या जिद्दीपणाचे आज सर्वत्र कौतुक केलं जातं असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर डॉ. प्रियंका बोरगे या सध्या भारतातच राहून वैद्यकीय प्रॅक्टिसद्वारे आपल्या लोकांची सेवा करणार असल्याचे सांगितले.
