अनिल ठाणेकर
ठाणे : जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली मे. एफ.डी.सी., एम.आय.डी.सी., धाटाव, रोहा, या कंपनीत आपली मान्यताप्राप्त युनियन असून, या कंपनीतील कामगारांना रुपये १३,०००/- ते १५,०००/- एवढा भरघोस पगारवाढीचा करार नुकताच पार पडला.
या करारावर संघटनेच्यावतीने सरचिटणीस संजय वढावकर, अध्यक्षा संज्योत वढावकर, उपाध्यक्ष शामकांत जोशी, सेक्रेटरी जगदीश उपाध्याय, संघटक सचिव सुहास खरिवले व कंपनीच्यावतीने सिनिअर वाईस प्रेसिडेंट – एच.आर. जफ्रुल्ला खान, सिनिअर जनरल मॅनेजर श्री. एन.एम. कोळेकर, सिनिअर मॅनेजर रवींद्र फडतरे, मॅनेजर विवेक जोशी, तसेच कामगार प्रतिनिधी भास्कर मोरे, चंद्रकांत भगत, नामदेव पवार, दिलीप शिर्के, वाल्मिक पाटील यांनी सह्या केल्या, अशी माहिती संघटनेचे खजिनदार प्रशांत शेट्ये यांनी दिली आहे.
मे. एफ.डी.सी., ही एम.आय.डी.सी., धाटाव, रोहा, येथे असून या कंपनीत जनरल मजदूर सभा, ठाणे ही मान्यताप्राप्त युनियन जवळ जवळ ३२ वर्षापासून नेतृत्व करीत आहे. या कंपनीतील सर्व कामगार जनरल मजदूर सभेचे सभासद झाले असून संघटनेतर्फे हा ११ वा करार या कंपनीत करण्यात आला आहे. युनियनने काही महिन्यांपासून व्यवस्थापनाबरोबर वाटाघाटी सुरु केल्या व हा यशस्वी करार नुकताच संपन्न झाला. या कराराचे फायदे या कंपनीतील साधारण ५६ कामगारांना मिळणार आहेत. ही भरघोस पगारवाढ मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.हा करार १ एप्रिल २०२३ पासून ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार आहे. मेडिक्लेम, मान्सून अलाउन्स, अटेंडंट अलाउन्स, सेवानिवृत्ती गिफ्ट, इमर्जन्सी मेडिकल असिस्टंट या सर्वांमध्ये वाढ करण्यात आली त्याचबरोबर इतर अनेक फायदे कामगारांना मिळणार आहेत.
0000
