आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने

ठाणे : आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने नॅको, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व राज्यामध्ये ईन्टेसिफाईड कॅम्पेनचे अनावरण कार्यक्रम घेण्यात आले. त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था वडाळा, मुंबई यांच्या वतीने अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग तथा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक श्री. मिलिंद म्हैसकर यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथील गावंड बाग येथे ईन्टेसिफाईड आयईसी कॅम्पेनचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामान्य लोकांमध्ये एचआयव्ही आणि गुप्तरोगाचे ज्ञान आणि समज वाढविणे आणि सुरक्षित लैंगिक व्यवहार, एचआयव्ही बाधितांसोबत भेदभाव व कलंक कमी करणे, एचआयव्ही आणि गुप्तरोगाच्या सेवांची मागणी निर्माण करणे, हा या ईन्टेसिफाईड आयईसी कॅम्पेनचा उद्देश होता. ईन्टेसिफाईड आयईसी कॅम्पेन उपक्रम१२ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
ईन्टेसिफाईड आयईसी कॅम्पेनअंतर्गत महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ६८ बस डेपोमध्ये ऑडियो अनाउन्समेंटद्वारे एचआयव्ही/ एड्स बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. युवकांमधील वाढते एचआयव्हीचे प्रमाण लक्षात घेवून त्यावर आधारित जनजागृतीपर एक लघुपट तयार करण्यात आला आहे. युवकांमार्फत सामान्य जनतेमध्ये एचआयव्ही/ एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी रेड रिबन क्लबच्या सदस्यांमार्फत ३४ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी फ्लॅश मॉब चे सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य आहे. त्यामुळे लोककलेच्या माध्यमातून गावागावांमध्ये एचआयव्ही/एड्स बाबत जनजागृती कार्यक्रम करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळया जत्रा, यात्रा होत असतात, याचे औचित्य साधून जत्रा, यात्रांमध्ये आयईसी स्टॉल उभारुन एचआयव्ही/ एड्स बाबत जनजागृती व ऐच्छिक एचआयव्ही तपासणी केली जाणार आहे. गावपातळींवर ग्रामपंचायत सदस्यांचे आणि गावकऱ्यांचे एचआयव्ही/एड्सबाबत संवेदीकरण करण्यात येणार आहे. बदलत्या काळानुसार एचआयव्ही/एड्स बाबतची अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सोशल मिडीयावर सखीचे कानमंत्र या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेवर एचआयव्ही/एड्स बाबत जनजागृती करण्यात येणार असून त्याचप्रमाणे खाजगी रेडिओ चॅनेलमार्फत जिंगल्सव्दारे जनजागृती करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.विजय कंदेवाड, आरोग्य सेवा, ठाणे परिमंडळ उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या हस्ते करण्यात आले. ईन्टेमिफाईड आयईसी कॅम्पेनअंतर्गत सोशल मीडिया मोहिमेचे अनावरण, एक चूक या एचआयव्ही/एड्स माहितीपर लघुपटाचे अनावरण, आरआरसीच्या विद्यार्थ्यांकडून फ्लॅश माँबचे सादरीकरण आणि लोककला पथकाचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच ५ कि.मी. राज्यस्तरीय रेड रन स्पर्धेमध्ये मुलांच्या गटामधून जळगाव जिल्ह्यातील एम.जे. महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. मुकेश धनगर हा प्रथम आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या संत तुकाराम महाविद्यालयाचा कु.अतुल जाधव द्वितीय आणि अमरावती जिल्ह्याच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा कु. उजेर खान हा तृतीय आला.
मुलींच्या गटांमध्ये धुळे जिल्ह्याच्या एच.आर. महाविद्यालयाची कु. शेवंता पावरा प्रथम, अमरावती जिल्ह्याच्या डॉ. गोळे फार्मसी महाविद्यालयाची कु. सलोनी लव्हाळे द्वितीय व आर. के. महाविद्यालयाची कु.योगिनी साळुंके ही तृतीय आली. सर्व विजेत्यांना अनुक्रमे रु.२५ हजार, रु.१५ हजार व रु.१० हजार, मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये भंडारा जिल्ह्याच्या तस्रीम पठाण हिने प्रथम, नाशिक जिल्ह्याच्या तनुश्री पगारे हिने द्वितीय व कोल्हापूर जिल्ह्याच्या जान्हवी कुलकर्णी हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सहभागी स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी टी. आय सहसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, सहसंचालक (वित्त) श्री. सुजित आकडकर, सहसंचालक (मूलभूत सेवा) डॉ. राहुल जाधव, सहसंचालक (गुप्तरोग) डॉ. लोकेश गभणे, सहसंचालक (मा.शि.सं.) श्रीमती सुदेष्णा चक्रवर्ती, सहायक संचालक डॉ. भवानी मुर्गेसन (प्रयोगशाळा सेवा) उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *