नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने घणसोली विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली 1) श्री. ज्ञानेश्वर यशवंत मढवी (जागामालक) व श्री. प्रविण नवनाथ म्हात्रे (विकासक), कोळीवाडा- घर क्र. 0536, घणसोली, नवी मुंबई व 2) श्री. उत्तमकुमार मनोरंजन शहा (विकासक), हुतात्मा जगदिश पाटील मैदानालगत, बाळारामवाडी, घणसोली, नवी मुंबई या दोघांचे आरसीसी तळमजला + 5 मजल्याचे बांधकाम प्रगतीपथावर होते, नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेकडून तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम हटविणेपोटी 10 कामगार, 3 ब्रेकर, 1 गॅसकटर व 1 जेसीबी सोबत या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. संजय तायडे, मुख्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे, मुख्यालयाचे कनिष्ठ अभियंता श्री. राज नागरगोजे व इतर अधिकारी / कर्मचारी पोलिस बंदोबस्तासह उपस्थित होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
