बदलापूर: कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते आहे. त्याच्या पूर्वसंध्येला नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांची लगबग पाहायला मिळत होती. कर्मचारी, अधिकारी आपापल्या दालनांमध्ये सजावट आणि इतर व्यवस्था पाहत होते. तर काही अधिकारी आपली केबिन याबाबत निवड करताना दिसत होते. गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे कामकाज गेली २४ वर्ष एका रुग्णालयाशी संलग्न असलेल्या इमारतीतून चालत होते. अतिशय अरुंद आणि कोंदट वातावरणात कर्मचारी आणि अधिकारी काम करत होते. अनेकदा गळती, पुरेशी जागा नसल्याने अनेक विभागांचा कारभार सभागृहातून चालायचा. तर नगररचना, अग्निशमन आणि इतर काही विभाग इतर इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत होते. आता नव्या इमारतीत एकाच ठिकाणी संपूर्ण शहराचा कारभार चालेल.
