अशोक गायकवाड
अलिबाग: मैफिल अलिबाग या संस्थेतर्फे आज सायंकाळी ७.०० वाजता आरसीएफच्या कुरूळ वसाहतीत सभागृहात सुरंजन खंडाळकर यांच्या सुश्राव्य भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
१९८९ साली स्थापन झालेल्या मैफिल अलिबागच्या गेल्या पंचवीस वर्षांचा सांगीतिक प्रवास अत्यंत दैदिप्यमान असाच आहे. या कालावधीत मैफिल,अलिबागने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कलाकारांच्या गायन-वादनाचा अभूतपूर्व सांगीतिक नजराणा पेश करून अलिबाग परिसरातील संगीत रसिकांना तृप्त केले आहे. यात पं. यशवंतबुवा जोशी, पं. शिवकुमार शर्मा, पं.हरिप्रसाद चौरासिया, पं. उल्हास कशाळकर, विदुषी प्रभा अत्रे, उस्ताद शहीद परवेझ, उस्ताद सैदुद्दिन डागर, पं. भवानीशंकर, पं. सुरेश तळवलकर आणि उस्ताद झाकीर हुसेन यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. शास्त्रीय संगीतासोबतच मैफिलने श्रीधर फडके, अशोक पत्की, सलील कुलकर्णी-संदीप खरे यांसारख्या नामवंत संगीतकारांचे दर्जेदार सुगम संगीताचेही कार्यक्रम तितक्याच समर्थपणे आयोजित केले होते. यामुळे गेल्या पंचवीस-तीस वर्षातील मैफिलसोबतचा सांगीतिक सहप्रवास हा अलिबाग परिसरातील रसिकांसाठी एक आनंददायी पर्वणी ठरला आहे. दरवर्षी आषाढ-श्रावण महिन्या दरम्यान असलेल्या विविधा धार्मिक उत्सवाच्या वातावरणाला अनुकूल म्हणून मैफिल तर्फे भक्तिसंगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या कार्यक्रमात विख्यात भजन गायक पं. रघुनाथ बुवा खंडाळकर यांचे सुपुत्र व शिष्य सुरंजन खंडाळकर हे सुश्राव्य भक्ति रचना सादर करणार असून त्यांना युवा कलाकार भैरवी डेरे या गायन साथ करणार आहेत. आपले पिता विख्यात भजन गायक आणि पं. जसारराज यांचे शिष्य पं. रघुनाथ बुवा खंडाळकर यांच्याकडे संगीताचे शास्रोक्त धडे घेणार्या सुरंजन यांना पं. मधुसूदन कुलकर्णी आणि पं. अजय पोहंकार यांची देखील तालिम लाभली आहे. ऑल इंडिया रेडिओचे ग्रेडेड आर्टिस्ट असणार्या सुरंजन यांनी देशभरातील बहुसंख्य प्रतिष्ठित संगीत महोत्सवात आपल्या गायनाची छाप रसिकांवर पाडली असून त्यांच्या सुरेल आवाजाची मोहिनी भारतासह जगभरातील रसिकांवर आहे. अलिबाग मधील कार्यक्रमात त्यांना कौस्तुभ तलेकर तबल्यावर, ओंकार उजागरे किबोर्ड वर तर पार्थ भुमकर यांची पखवाज साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय गोखले करतील. अलिबाग परिसरातील भजन प्रेमी रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे. कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
00000
