‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेत निवड झालेल्या

नवी मुंबई : कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ जाहीर केली असून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेव्दारे राज्यातील युवकांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणा‌व्दारे (इंटर्नशिप) रोजगारक्षम करून उद्योगांकरिता कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ 18 ते 35 वयोगटातील युवक घेऊ शकणार असून 6 महिने कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधी असणार आहे. उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतन मिळणार असून 12 वी उत्तीर्णांना रु. 6 हजार, आय.टी.आय व पदविका उत्तीर्णांना रु. 8 हजार तसेच पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांना रु.10 हजार दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.
याकरिता शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेत 6 महिन्यांच्या कालावधीकरिता शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणेकरिता 30 संवर्गातील एकूण 194 पदांसाठी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले.
याकरिता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात 14 व 20 ऑगस्ट रोजी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले असून युवकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते. त्यामध्ये 14 ऑगस्टच्या शिबिरात प्राप्त 125 अर्जांपैकी पात्र झालेल्या 110 उमेदवारांची 6 महिन्यांच्या कार्य प्रशिक्षणाकरिता (इंटर्नशिप) निवड करण्यात आली असून त्यामधील 10 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाकरिता रूजू होण्याचे आदेश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
अशाच प्रकारचे शिबिर यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे उर्वरित पदांसाठी 20 ऑगस्टला सकाळी 10 वाजता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भूखंड क्र.1, सेक्टर 15 ए, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी इच्छुक उमेदवारांनी आपले संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी / दूरध्वनी क्रमांक, मेल-आयडी, शैक्षणिक अर्हता, जन्मतारीख, बँक ‍तपशील इ. कागदपत्रांसह उपस्थित रहावे असे सूचित करण्यात येत आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी तसेच नियुक्तीच्या अनुषंगाने शासनाकडील 9 जुलैच्या शासन निर्णयामधील सर्व अटी व शर्ती उमेदवारावर बंधनकारक राहतील याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.
तरी पात्र युवकांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा लाभ घेण्यासाठी 20 ऑगस्टला महापालिका मुख्यालयात आयोजित शिबिरास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *