माथेरान : झुकझुक झुक आगीनगडी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, ह्या पंक्तीची आठवण करून देणारी माथेरान ची महाराणीची निवड जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणजेच युनेस्को मध्ये झाल्याने माथेरानला एक वेगळे महत्व प्राप्त झाले असून शंभर वर्षाहून अधिक काळ पर्यटकांची अविरत सेवा करणाऱ्या ह्या गाडीचा सर्वच महाराष्ट्रातील पर्यटकांना अभिमान वाटू लागला आहे.
माथेरानच्या ह्या महाराणीचा नेरळ माथेरान प्रवास खूप रंजक आहे 1850 साली इंग्रजांनी माथेरानचा शोध लावला इथले हवामान व गारवा इंग्रजांना आवडू लागल्याने त्यांनी इथे हळूहळू पर्यटनस्थळ विकसित व्हावे म्हणून लहान लहान भूखंड बनवून ते विकसित करण्यास सुरुवात केली. त्यानुसार माथेरानमध्ये अनेक बंगले उभे राहू लागले व हॉटेल सुद्धा सुरू झाले.1856 ला जॉन मॅन्युअल डिसुझा यांनी माथेरानमध्ये पहिले हॉटेल सुरू केले त्यामुळे माथेरान कडे पर्यटक येण्यास सुरुवात झाली काहीजण नियमित माथेरानला येत असत त्यातील एक नाव म्हणजे सर आदमजी पिरभोय हे माथेरानला नेहमी येत असत त्याकाळी नेरळ हुन माथेरानला येण्यासाठी घोडे किव्हा डोली चा वापर होत असे पण इंग्रजांना प्रथम प्राधान्य दिले जायचे त्यानंतर मग भारतीयांना वाहन मिळत असे. असेच एकावेळी आदमजी पिरभोय नेरळला माथेरानसाठी जाण्यास आले असता त्यांना वाहन उपलब्द झाले नाही त्यावेळी निराश होऊन ते पुन्हा मुंबईला परत गेले पण जाताना मनामध्ये एक निश्चय करूनच गेले की माथेरानला जाईन ते स्वतःच्या वाहनानेच. त्यांना मिनिट्रेनची कल्पना सुचली व मुंबईला जाताच ते परवानगी मिळण्याच्या त्यांनी शासनाकडे साकडे घातले सुरवातीस ह्या मार्गावर ट्रामवे ची कल्पना पुढे आली होती पण ब्रिटिश सरकारने ती फेटाळून लावली पुढे 1903 ला सर आदमजी पिरभोय यांची पर्वतीय रेल्वेमार्ग ही संकल्पना अनेक तडजोडी नंतर मंजूर करण्यात आली व कालका, शिमला ह्या मार्गाच्या धर्तीवर ह्या मार्गाची आखणी करण्यात आली पण सर्वात मोठी अडचण ही होती की माथेरानला येण्याकरिता मार्ग उपलब्द नसल्याने मार्गाच्या उभारणी करिता सामान वाहून नेणे खूप कठीण काम झाले होते पण सर आदमजी पिरभोय व त्यांचे पुत्र अब्दुल हुसेन पिरभोय या पितापुत्रांनी हे शिवधनुष्य उचलले 1901 साली सर आदमजी पिरभोय यांच्या डोक्यात नेरळ माथेरान मिनिट्रेन सुरू करण्याची कल्पना आली व सर आदमजी पिरबॉय यांनी 16 लाख रुपये खर्च करून स्वतःच्या मालकीची ही मिनिट्रेन सुरू करण्यासाठी 1903 साली सुरवात केली, ह्या करिता परिसरातील नेरळ, बेकरे, मालदुंगा व माथेरान येथील 250 एकर जागा हस्तांतरित करून ह्या कामास सुरुवात करण्यात आली,अतिशय दुर्गम भाग व कोणतीही आधुनिक साधने नसतानाही त्यांनी 1907 पर्यंत हा मार्ग पूर्ण केला डोंगराच्या कडेकडेने नागमोडी 127 तीव्र वळणे ह्या मार्गावर आहेत. रायसाहेब हिराचंद या कल्पक अभियंत्यांच्या देखरेखीखाली व इंजिनियर एव्हर्ड क्लॅथ्रूप यांच्या तांत्रिक सल्ल्याने हा खडतर मार्ग बनवला गेला त्यामुळे ह्या रेल्वेचे महत्व वाढते माथेरानच्या डोंगर उतारावर ट्रेन चालवने जिकरीचे असल्याने त्यांनी 62 सेमी अंतर असलेली ईटा गेज मार्गाची संकल्पना यशस्वी राबविली एका भारतीयाने फक्त जिद्दीच्या जोरावर फक्त चार वर्षांमध्ये नेरळ माथेरान मिनिट्रेन सुरू केली सुरवातीस जर्मन बनावटीची कोळशावर चालणारी इंजिने ह्या मार्गावर धावू लागली नेरळ माथेरान ह्या मार्गावर प्रवाशांना तसेच कोळशावर चालणाऱ्या इंजिनांना विश्राम व पाणी भरता यावे म्हणून नेरळ,जुमापट्टी, वॉटर पाईप, अमन लॉज व माथेरान अशी पाच स्थानके निर्माण करण्यात आली नेरळ माथेरान मिनिट्रेन सुरू करण्यासाठी आदमजी पिरभोय यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ब्रिटिश सरकार ने त्यांना सर ही पदवी देऊन गौरव केला होता
कोळशावर चालणाऱ्या इंजिनांमुळे अनेक वेळा वणवे लागत असल्याने पर्यायी इंजिने व्हावी अशी पर्यावरण वादांची मागणी होती स्वातंत्र्यानंतर इतर सर्व खाजगी रेल्वेमार्गांप्रमाणे नेरळ-माथेरान रेल्वेदेखील भारत सरकारच्या अखत्यारीखाली आली. १९८३ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. ही बंद केलेली इंजिने आज ही हेरिटेज म्हणून दिल्ली, छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई ,नेरळ व माथेरान स्थानकांमध्ये उभी करण्यात आली आहेत.
जागतिक वारसा जतन करण्याच्या यादीत माथेरान मिनिट्रेन ला स्थान देण्यात आले असून सर्व बाबी अंतिम टप्प्यात असून लवकरच माथेरानची मिनिट्रेन जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात येईल ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असणार आहे.
00000
