धारावी : श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला आठवडाभरावर आल्याने सर्वत्र या सणाची जोरदार तयारी सुरू आहे. दहीहंडीसाठी लागणारी मटकी बनवण्याचे काम धारावीतील कुंभारवाड्यात अनेक वर्षांपासून सुरू आहे. सध्या मटकीवरील कलाकुसरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती येथील विक्रेत्यांनी दिली.
श्रावण महिना सुरू होताच सणांना सुरुवात होते. यातीलच तरुणाईला सर्वात आकर्षित करणारा सण म्हणजे गोपाळकाला. मंगळवारी (ता. २७) दहीहंडीचा सण साजरा करण्यात येणार असून गोविंदा पथकांचा जागोगाजी सराव सुरू आहे. गोपाळकाल्याला लागणाऱ्या हंडी (मटकी) या मातीच्या बनवल्या जातात. धारावीतील कुंभारवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून कुंभार समाजाचे लोक हा व्यवसाय करतात. यातील काही कुटुंबे मटकी बनवण्याचा धंदा पिढ्यानपिढ्या करीत आहेत, तर काही कुटुंबे या तयार मटक्यावर कलाकुसर करण्याचे काम करतात. यातीलच एक गोविंद चित्रोड यांचे कुटुंब हे गेल्या तीन पिढ्यांपासून मटक्यावर कलाकुसरीचे काम करत आहे. पूर्वी मटक्यांना कच्च्या रंगाने रंगविले जायचे. त्यानंतर ब्रशचा वापर करून रंग दिले जात होते, परंतु बदलत्या काळानुसार सध्या ऑईल पेंटने मटक्यांना रंग दिला जातो. हे सर्व काम अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. दहीहंडीच्या दोन महिने अगोदरपासून या कामास सुरुवात केली जात असल्याची माहिती गोविंद यांनी दिली. गोविंद यांच्या भावाची पत्नी गीता, मुली हेतवी, एकता व मुलगा व्रज याकामी हातभार लावत आहेत.
हसमुख परमार हे गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. त्यांचे तीन भाऊ व कुटुंबाने गेल्या काही दिवसांपासून या कामाला सुरुवात केली आहे. धारावीसह अनेक विभागातून हंडी खरेदी करण्यासाठी गोविंदा व मंडळे येतात. हजारो हंडी बनवून त्यांची विक्री केली जाते. दहीहंडीच्या आदल्या दिवसांपासून हंडी विक्रीला जोर येतो. अनेकदा दहीहंडीच्या दिवशी हंडी विक्रीसाठी उपलब्ध नसते. या व्यवसायात म्हणावा तसा आर्थिक फायदा होत नसतानाही इथले लोक आपल्या पूर्वजांनी सुरू केलेले काम बंद पडू नये, यासाठी पोटाला चिमटा घेऊन हे काम करीत आहेत. चित्रोड यांच्या घरातील एकूण ५ व्यक्ती हे काम करतात. तयार केलेली मटकी गोविंद चित्रोड मुंबईतील इतर भागात नेवून विकतात.
पूर्ण कुटुंबीयांचा सहभाग
या वस्तीतील तरुण मुलं-मुली, शाळा, कॉलेज शिकत या कामाला मदत करतात. पूर्ण कुटुंबीय मिळून हे काम पूर्ण करतात. सुमारे १०० परिवार मटक्यावर कलाकुसरीचे काम आजच्या घडीला करत आहेत.
असे आहेत दर
होलसेलमध्ये किमान ९० ते ३०० रुपयांना हंडी विक्री होत असल्याचे विक्रेते हसमुख परमार यांनी सांगितले. किरकोळमध्ये किमान १५० ते ५०० रुपयांपर्यंत हंडीची विक्री होते.
