झारखंड: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी पक्षाविरोधात उघड बंड केले आहे. सोशल मीडियाच्या बायोमधूनही पक्षाचे नाव हटवले आहे. यामुळे ते पक्षाच नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चंपाई सोरेन भाजपात जातील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेल्या तीन दिवसांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्यांना फक्त खुर्चीची चिंता होती. ज्या पक्षासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्या पक्षात माझे अस्तित्वच नाही, असे मला वाटले, या दरम्यान अशा अनेक अपमानास्पद घटना घडल्या, ज्यांचा उल्लेख मला या क्षणी करायचा नाही. इतका अपमान आणि अवहेलना केल्यानंतर मला पर्यायी मार्ग शोधणे भाग पडले, असंही चंपाई सोरेन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
चंपाई सोरेन म्हणाले की, विधीमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, मात्र मला बैठकीचा अजेंडाही सांगण्यात आला नाही, बैठकीत माझा राजीनामा मागितला गेला. मला आश्चर्य वाटले, पण मला सत्तेचे आकर्षण नव्हते, म्हणून मी तात्काळ राजीनामा दिला, पण माझ्या स्वाभिमानाला धक्का लागल्याने माझे मन भावूक झाले.
