अनिल ठाणेकर
ठाणे : महाराष्ट्रातील प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महायुती सरकारने ठरविले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलेला `लखपती दीदी’ बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारला लाडक्या बहिणींनाही लखपती बनवायचे आहे, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.
राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. या योजनेचा ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता नोंदणीकृत बहिणींच्या खात्यातही जमा झाला. महायुती सरकारने ही राज्यातील बहि‍णींना दिलेली रक्षाबंधनाची ही भेट ठरली. या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाने अंधेरी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील महिलांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. लाभार्थी बहीणी ज्योती गिरी व रुपा केळकर यांनी श्री. फडणवीस यांच्याकडे भावना व्यक्त केल्या. त्यावेळी प्रत्येक महिलेला लखपती बनविण्याचे ध्येय ठेवले असून, आम्ही बहिणींना लखपती बनवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
भाजपा ठाणे व महिला मोर्चाच्या वतीने ठाण्यातील महाजनवाडी येथील सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शेकडो ठाणेकर बहि‍णींची उपस्थिती होती. या वेळी आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर, माजी नगरसेवक संदीप लेले, सुनील हंडोरे, राजकुमार यादव, माजी नगरसेविका अर्चना मणेरा, कविता पाटील, कमल चौधरी, नम्रता कोळी, नंदा पाटील, मृणाल पेंडसे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, भाजपाचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचे आर्थिक जीवन समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्न करीत आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा १५०० रुपये दिले गेले. तर वार्षिक तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. लेक लाडकी योजनेतून मुलींना १८ वर्ष झाल्यावर १ लाख रुपये मिळणार आहेत. एस. टी. मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत आहे. लाडक्या बहिणींना भक्कम आधार दिला जात आहे, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी ज्योती गिरी यांच्या प्रतिक्रियेवर व्यक्त केली. संसार सांभाळू शकणारी स्त्री जगालाही सांभाळू शकते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महिलांचा गौरव केला. या कार्यक्रमाला शहरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाजनवाडी हॉल खच्चून भरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *