अनिल ठाणेकर
ठाणे : कोट्यवधींच्या दहीहंडी उभारून प्रसिद्धी घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, जखमी झालेल्या गोविंदांकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. मात्र, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या तालमीत घडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजीत पवार यांनी सामाजिक भान ठेवून एका जखमी गोविंदावर ज्युपिटर हाॅस्पीटलमध्ये स्वखर्चाने शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे त्यांचे कौतूक होत आहे.
ओम साई गोविंदा पथकात वरच्या थरावर चढणारा जिग्नेश तांबडे हा तरूण दहिहंडी फोडताना खाली पडला होता. त्यामध्ये त्याच्या हाताचे हाड मोडले होते. सुरूवातीला त्याला छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्काळ शस्त्रक्रियेची गरज. असतानाही १५ दिवसांनंतरची तारीख देण्यात आली. जिग्नेश याची आर्थिक परिस्थितीची जेमतेम असल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचार घेणे अशक्य होते. ही बाब अभिजीत पवार यांना समजताच त्यांनी तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात धाव घेऊन त्याचा स्वतःच्या जबाबदारीवर डिस्चार्ज करून घेतला अन् त्याला ज्युपिटर रूग्णालयात दाखल करून तत्काळ स्व खर्चाने शस्त्रक्रिया करून घेतली. काल त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळाली. आता त्याची प्रकृती व्यवस्थित असून अभिजीत पवार यांनी दाखविलेल्या या सामाजिक उत्तदायित्वाचे परिसरात कौतूक होत आहे. याबाबत अभिजीत पवार यांच्याशी संपर्क साधला असता,” डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दहीहंडीचा सण जागतिक स्तरावर नेला. त्यांनी गोविंदांना कधीच वाऱ्यावर सोडले नाही. गोविंदांची स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांसारखी काळजी त्यांनी घेतली होती. आपण त्यांच्या शिकवणीवरच चालत आहोत. आपण फारसे काही वेगळे केले नाही. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी आखून दिलेल्या मार्गावरच चालण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले.
०००००
