अनिल ठाणेकर/अरविंद जोशी
मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवर मीरा भाईंदरच्या हद्दीत ३ भुयारी मार्ग म्हणजेच वाहनांचा अंडरपासची कामे व एका फूटओव्हरब्रीजच्या मंजूर झाली असून सुमारे ५५ कोटी रुपये खर्च करून गणेशोत्सवानंतर कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे हायवेवर होणारे पादचाऱ्यांचे अपघात टळणार आहेत. एप्रिल २०२५ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
हायवेवर रस्ता ओलांडताना अनेक अपघात याआधी झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना जर रस्ता ओलांडायचा असेल तरीही येथे धोकादायक स्थिती आहे. त्यामुळे याठिकाणी भुयारी मार्ग , फूट ओव्हर ब्रिज मंजूर करण्यात यावेत अशी मागणी करून आमदार सरनाईक यांनी त्याचा पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीप्रमाणे कामे मंजूर झाली असून आज आमदार सरनाईक यांनी हायवेवर या भुयारी मार्गाच्या जागांची पाहणी केली. प्रस्तावित मेट्रो मार्गिकेची जागा किंवा अन्य कारणामुळे आतापर्यंत ही कामे मार्गी लागत न्हवती. पण अखेरीस आता ३ भुयारी मार्ग , एक फुटओव्हर ब्रिज मार्गी लागला आहे. सिग्नल दिल्ली दरबार जवळ आणि पांडुरंगवाडी (सम्राट हॉटेल जवळ) येथे वाहन अंडरपास म्हणजेच भुयारी मार्ग मंजूर करण्यात आला आहे. यातील पांडुरंगवाडी येथे होणाऱ्या भुयारी मार्गामुळे लता मंगेशकर नाट्यगृहात जाणाऱ्या व आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना फायदा होणार आहे.तर वेस्टर्न हॉटेल परिसरात एक छोटा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. हिल टॉप हॉटेल जवळ एक ‘फूट ओव्हर ब्रिज’ही पादचाऱ्यांसाठी बनवला जाणार आहे. VUP म्हणजे ‘व्हेइक्युलर अंडरपास’ (वाहने व पादचाऱ्यांना जाण्यासाठी भुयारी मार्ग) हे ३ ठिकाणी तयार केले जाणार आहेत. जेणेकरून स्थानिक वाहने व पादचारी त्याचा वापर करू शकतात. हायवेवर वाढणारी वाहनांची संख्या आणि अनेकदा होणारे अपघात पाहता ही भुयारी मार्ग , पादचारी पुलांची आवश्यकता होती. माझ्या सततच्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागले आहे , असे आमदार सरनाईक म्हणाले. मीरा भाईंदरच्या हायवे पट्ट्यातील नागरिकांना रस्त्यावरून येणा-या वाहनांच्या सोयीसाठी स्वतंत्र अंडरपास उपलब्ध यामुळे होणार आहेत. हायवेवर या भुयारी मार्गाच्या कामांची टेंडर प्रक्रिया झाली असून ठेकेदाराला कार्यादेशही देण्यात आला आहे. सध्या श्री गणेशोत्सव काळात लोकांना त्रास नको म्हणून श्री गणेशोत्सव झाल्यानंतर या कामांना सुरुवात करा. मीरा भाईंदर महापालिकेने या भुयारी मार्गासाठी आवश्यक ते सहकार्य आणि परवानगी देण्याची प्रक्रिया केलेली आहे तसेच वाहतूक पोलिसांनीही तात्काळ परवानगी देऊन या कामास आवश्यक ते सहकार्य करावे. श्री गणपती उत्सवानंतर सुरु होणारे काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करा, अशा सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी केल्या. आमदार सरनाईक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी , स्थानिक नागरिक आणि नॅशनल हायवे ऍथॉरिटी मॅनेजर सुमित कुमार हे उपस्थित होते. हायवेवर हे काम मंजूर करण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु होता. राज्यातील हायवेच्या विविध कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हे भुयारी मार्ग , पादचारी पुलाचे काम मंजूर झाले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानतो , असेही आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
0000
