नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक श्रीगणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करुन समाजामध्ये एकात्मता आणि सामाजिक सलोखावृध्दी ही उद्दिष्ट्ये साध्य होण्यासाठी तसेच या माध्यमातून पर्यावरणाचे महत्व प्रसारित होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे याकरिता ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा – 2024’ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीद्वारे प्रामुख्याने पर्यावरणशील (Eco Friendly) मूर्ती व प्लास्टिकमुक्त सजावट आणि पर्यावरणपूरक बाबींचा विचार केला जाणार आहे. या अनुषंगाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येउुन त्यांना सन्मानित केले जाणार आहे.
या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांची परवानगी घेतलेल्या तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी असलेल्या नमुंमपा क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. सहभागी होणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास परीक्षण समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देईल व उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पाहणीअंती निवड करेल.
निवड समितीव्दारे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट 03 तसेच उत्तेजनार्थ 02 गणेशोत्सव मंडळांची निवड केली जाईल. याशिवाय इकोफ्रेंडली व प्लास्टिकमुक्त गणेशमूर्ती तसेच इकोफ्रेंडली व प्लास्टिकमुक्त सजावट असे 02 विशेष पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. निवड झालेल्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला रु. 25,000/- प्रथम पुरस्कार तसेच व्दितीय मंडळाला रु.22,000/- व तृतीय मंडळाला रु.20,000/- रक्कमेचे पारितोषिक आणि उत्तेजनार्थ 02 मंडळांना प्रत्येकी रु.18,000/- पारितोषिक दिले जाईल. याशिवाय विशेष पुरस्कार विजेत्या मंडळांना प्रत्येकी रु.१०,०००चे पारितोषिक देण्यात येईल. या मंडळांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सोबत दिलेल्या https://forms.gle/MK6PxgsC2C1CB73c6 या गुगल लिंकवर दि. 11 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज भरावेत असे सूचित करण्यात येत आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा – 2024 मध्ये जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
00000
