स्वाती घोसाळकर
मुंबई : लाडकी बहीण कुणाची यावरून सध्या महायुतीत जोरदार श्रेयवादाची लढाई सुरु आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री हा शब्द वगळून ‘माझी लाडकी बहीण’ आणि ‘एकच वादा… अजित दादा’ अशा घोषणा सोशल मीडियातून आणि व्यासपीठावरून व्हायरल केल्याने ठिणगी पडलीय. या एकच वादावरू भाई म्हणजे शिवसेनेचे राष्ट्रीय प्रमुख एकनाथ शिंदे आणि दादा म्हणजे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे नेते आमनेसामने उभे ठाकले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याचे पडसाद पहायल मिळाले.
सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा झाला. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय असा दादा भूसे, दीपक केसरकर या शिंदे गटाच्या मंत्र्यांचे म्हणणे होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. या योजनेचे श्रेय कोणा एकचे नसून ते सरकारचे आहे असे ते म्हणाले.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी प्रत्येकवेळी महायुतीसाठी आम्ही सबुरीने घेतो. परंतू पुन्हा पुन्हा तेच होत असेल, एखाद्या बॅनरवर लाईन आली तर समजू शकतो. पण जाणून बुजून मुख्यमंत्री हा शब्द नसावा हा अट्टाहास कशाला हवा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपल्या सरकारचं यश आहे. सर्वजण मिळून करत आहोत पण मग एकच वादा, दादा का वादा हे का. पक्षाच्या कार्यक्रमात या घोषणा चालतात. आम्ही शिंदे साहेबांचा घोष करु. कोणी देवेंद्र फडणवीस यांचे करतील. याला आमचा विरोध नाही. पण एखादी योजना आम्ही आणली असं सांगणं इतरांना दुखावण्याचा प्रकार आहे.
‘काही लोकांचा हा अट्टाहास आहे. पण हा वाद जास्त प्रमाणात उद्भवला तर याचा त्रास सगळ्यांना होणार आहे.त्याची तयारी करावी लागेल. म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कुरबूर झाल्याचं कळतंय. विषय तोच आहे. आपल्याला मिळून सरकार चालवायचं आहे. वेगवेगळं केलं तर तुमच्यात एकवाक्यता कुठे आहे. मग कोण तुम्हाला उभे करेल.’ असं ही शिरसाठ म्हणाले.
