काहीतरी नवीन…

श्याम तारे

माणसाला दिवसभर सूर्याचा प्रकाश उपलब्ध असतोच पण त्याला रात्रीच्या प्रकाशासाठी चंद्र पुरत नाही. त्यामुळे चंद्राचा आल्हाददायक प्रकाश बाजूला ठेवून तो कृत्रिम प्रकाशाच्या मागे लागला. संशोधकांनी वीज शोधून काढली. घराघरात पूर्वी रात्रीच्या प्रकाशासाठी छोटी चिमणी किंवा अधिक प्रकाशासाठी कंदील असायचे. त्या प्रकाशात सगळी कामे व्हायची. पण वीज आल्यानंतर विजेचे दिवे आले आणि घरे आतून बाहेरून लक्ख प्रकाशाने भरून निघू लागली. विजेचा इतका बोलबाला सुरु झाला की आपण या जगात आपल्याशिवाय आणखीही जीव-जंतू आहेत हेच विसरलो.
पर्यावरणावर याचा काही परिणाम होईल हे आपण सोयीस्करपणे लक्षात घेण्याचे टाळले. मात्र एक परिणाम कीटकांवर झाला. जे कीटक रात्रीच्या वेळी वनस्पतींची पाने खाऊन जगतात त्यांना हा एक तर घरातला आणि दुसरा म्हणजे रस्त्याच्या दिव्यांच्या प्रखर प्रकाशाने आपले जीवन जगणे कठीण झाले. त्यांना आहारासाठी अंधाराचा आडोसा असणाऱ्या वनस्पतींच्या शोधात भटकावे लागत आहे.
संशोधकांच्या मते यामुळेच जगातील कीटकांची संख्या कमी होत असून त्यामुळे पर्यावरणाच्या संतुलनावर विपरीत परिणाम होणार आहे. चीन देशाची विज्ञान संस्था आणि तेथील शुआंग झांग या वैज्ञानिकासोबत काम करणाऱ्या चमूचे हे निरीक्षण महत्वाचे आहे. शुआंग झांग म्हणतात की नैसर्गिक पर्यावरणापेक्षा बहुतेक सर्व शहरी पर्यावरणात कीत्कांनी वनस्पतीच्या पानांचा आहार फारच कमी केला आहे आणि याचे मूळ कारण शहरातील रात्रीच्या वेळी असलेला प्रखर प्रकाश हे दिसते.
या अभ्यासासाठी चमूने शहरातील सर्वसाधारणपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांची बरीच पाने एकत्र केली आणि त्यांच्यावरील प्रभावाचे (कीटकांच्या आहाराचे) निरीक्षण केले. या रस्त्यांवरील प्रकाशाच्या तीव्रतेची नोंद घेण्याव्यतिरिक्त त्यानी पानांचा आकार, त्यातील पाण्याचे प्रमाण, प्रत्येक वनस्पतीत असलेल्या रासायनिक सुरक्षा कवचाचे स्वरूप, पानापासून मिळणारी पोषक तत्वे, पाने मृदू की कडक आणि या झाडांवर असणाऱ्या कीटकांची माहिती गोळा केली. एक निरीक्षण असे होते की रात्रीच्या कृत्रिम प्रकाशामुळे पाने अधिक कडक होत होती. पाने कडक झाल्यामुळे झाडांना इजा कमी झाली हे खरे असले तरी कीटकांना घातक ठरणारा रात्रीच्या दिव्यांचा प्रकाश आणि त्याच्या ऊर्जेचा उपयोग झाडाची पाने कडक करणे आणि कीटकांना दूर ठेवणे या दोन प्रकारातून झाडांना काही प्रमाणात सुरक्षितता देत होता.
आणखी एक निरीक्षण असे होते की वनस्पती अथवा झाडांच्या प्रकारानुसार त्यांच्या पानांमढील पोषक तत्वे देखील प्रकाशाच्या तीव्रतेनुसार कमी अधिक होत होती. अधिक प्रमाणातील कृत्रिम प्रकाशामुळे एका झाडाच्या पानांमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी झालेले दिसले तर दुसऱ्या झाडाच्या पानात ते वाढलेले दिसले.
झाडांची पाने खाऊन त्यावर जगणाऱ्या या अतिशय छोटया कीटकांची आणखी एक महानता आहे. आजच्या घडीला या कीटकांचे वजन पृथ्वीवरील सर्व मानव आणि प्राणी यांच्या एकूण वजनापेक्षा अधिक आहे. त्यांचे कार्यक्षम असणे पृथ्वीच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
प्रकाशाचे प्रदूषण कीटकांसाठी घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांची दिशाभूल होणे आणि त्यांना रात्रीच्या वेळी परागकण प्राप्त करण्यामधील अडचण लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण दिवसेंदिवस पृथ्वीवरील कृत्रिम प्रकाश वाढवीत आहोत आणि त्यासोबतच झाडांची कत्तलही सुरूच आहे.
जगभरातील कीटकांची संख्या कमी होणे हे चांगले लक्षण नाही आणि त्यावर माणसाला लवकरच काही तरी उपाय शोधून काढावा लागेल.
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *