गौरीपाडा येथे PPP तत्वावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

 

 

डोंबिवली : गणरायाचे आगमन कल्याणकरांसाठी आरोग्यवार्ता घेऊन आले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून कल्याणात सुसज्ज हॉस्पिटलची मागणी होत होती. त्यानुसार गौरीपाडा येथे पीपीपी तत्वावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.

नुकतीच या जागेची पाहणी आमदार विश्वनाथ भोईर, पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी केली आहे. याची निविदा प्रक्रीया लवकरच पार पाडली जाईल असे यावेळी सांगण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे एक सक्षम व सुसज्ज अशी आरोग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे. कल्याण डोंबिवलीत अद्यावत असे रुग्णालय असावे अशी मागणी होत आहे. केडीएमसीने शहरात विविध सुविधांची कामे हाती घेतली असून यामध्ये रुग्णालयांचा देखील समावेश आहे.

कल्याण येथे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय असावे अशी मागणी कल्याण करांच्यावतीने कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावतीने करण्यात आली होती. आमदार भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.

मुख्यमंत्री शिंदे यांनी केडीएमसी प्रशासनाला कल्याणमध्ये सुसज्ज असे हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले होते. पालिका प्रशासनाने देखील यामध्ये तत्परता दाखवित कार्यवाही सुरु केली. गौरीपाडा येथे तळ अधिक तीन मजली बांधून तयार असलेली इमारत केडीएमसीला प्राप्त झाली आहे. या जागेची पाहणी आमदार भोईर यांनी नुकतीच केली.

या पाहणी दौऱ्यावेळी केडीएमसी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, साथरोग नियंत्रण विभाग अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, माजी नगरसेवक गणेश जाधव, डॉ. धीरज पाटील अंकुश जोगदंड, अंकुश केणे, अशोक भोईर आणि केडीएमसीचे माजी उपआयुक्त प्रकाश गव्हाणकर आदि उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *