अर्जुन बिराजदारचा तिहेरी मुकुट
 बिराजदार बंधूंचा दुहेरी मुकुट, अकॅडमीला ५ सुवर्णांसह १ कांस्यपदक
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे राबविण्यात येणाऱ्या ‘सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजने’अंतर्गत प्रगत प्रशिक्षण घेणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी बिलासपूर, छत्तीसगड येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरराज्य वैयक्तिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत महाराष्ट्रासह ठाण्याचा झेंडा उंचावला. अकॅडमीच्या खेळाडूंनी तब्बल पाच सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाई करत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांतील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी युवा खेळाडू अर्जुन तानाजी बिराजदार याने केली. त्याने एकाच स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावत तिहेरी मुकुट मिळवण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. अर्जुन आणि आर्यन तानाजी बिराजदार या बंधूंनीही दोन गटात विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला.
वरिष्ठ पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित अर्जुन आणि आर्यन बिराजदार जोडीने नैवेद्य तोंडे व रुद्र प्रताप ठाकूर जोडीवर मात करत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर १९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटातही अव्वल मानांकित अर्जुन-आर्यन जोडीने याच प्रतिस्पर्धी जोडीचा पराभव करत दुसरे सुवर्णपदक मिळवले. १९ वर्षांखालील मिश्र दुहेरीत अर्जुन तानाजी बिराजदार याने ठाण्याच्या सिया वायदंडे हिच्यासोबत खेळताना अंतिम सामन्यात अव्वल मानांकित सार्थक कांत थॉमस व इशिका पोद्दार जोडीचा पराभव केला. त्यामुळे अर्जुनच्या नावावर तीन सुवर्णपदके जमा झाली.
वरिष्ठ मिश्र दुहेरीत द्वितीय मानांकित सर्वेश महेश यादव याने नेहल गोसावीच्या साथीने अंतिम सामन्यात अव्वल मानांकित सौरभ साहू व हिरल चौहान जोडीवर मात करत सुवर्णपदक पटकावले. वरिष्ठ महिला दुहेरीत अव्वल मानांकित अनघा करंदीकर हिने नेहल गोसावीच्या साथीने द्वितीय मानांकित आशिता दुबे व स्वाती सोलंकी जोडीचा पराभव करत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. वरिष्ठ पुरुष एकेरीत सर्वेश महेश यादव याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत कांस्यपदक मिळवले. त्यामुळे अकॅडमीच्या खात्यात पाच सुवर्ण आणि एक कांस्य अशी पदकांची दमदार कमाई झाली.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपआयुक्त मीनल पालांडे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक आणि संपूर्ण प्रशिक्षक चमूचे अभिनंदन केले. ठाणे महानगरपालिकेकडून खेळाडूंना मिळणाऱ्या दर्जेदार क्रीडा सुविधा, अद्ययावत पायाभूत सोयी आणि प्रशासकीय पाठबळामुळे ठाण्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, राजीव गणपुले, कबीर कंझारकर, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर आणि फूलचंद पासी हे खेळाडूंच्या शारीरिक, तांत्रिक आणि मानसिक तयारीसाठी मेहनत घेत आहेत. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंची कठोर मेहनत यामुळेच हे यश मिळाले असून, अकॅडमीच्या या कामगिरीचे ठाणे शहर आणि क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *