मुख्यमंत्री शिंदेनी बोलावली सेनेच्या मंत्र्याची तातडीची बैठक

स्वाती घोसाळकर

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर व्युव्हरचना करण्यासाठी आणि महायुतीतील बेबनाव संपुष्टात आणण्यासाठी ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमित शहा आपल्या सह्याद्री अतिथी गृहातील मुक्कामी लोकसभेच्या पराभवासाठी संबधित सगळ्यांची हजेरी घेणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही सह्याद्री अतितीगृहावर हजर होते. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची रात्री उशीरा तातडीची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलवली असल्याने चर्चेला उधान आले आहे. या बैठकीसाठी जळगावहून गुलाबराव पाटील आणि पुण्यातून तानाजी सावंत हे दोघे मंत्रीही निघाल्याची माहिती आहे. या दोघांची राष्ट्रवादीविरोधीतील विधाने चांगलीच गाजली होती. त्यामुळे आज अमित शहांच्या पाठशाळेत कुणाकुणाची हजेरी लागतेय याकडेही सगळ्यांच्या नजरा आहेत. अमित शाह यांची सह्याद्री अतिथीगृहात भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. तसेच अमित शाह यांची महायुतीच्या नेत्यांसोबतही बैठक होणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान,  अमित शाह यांना भेटण्यासाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रविंद्र चव्हाण आदी नेत्यांचा समावेश होता.

आपल्या या मुंबई भेटीत अमित शहा लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारही त्यांच्या सोबत असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *