मुंबई : राज्यात धुमधडाक्यात सुरु असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीणी’ योजनेचा फटका राज्यातील होमगार्डना बसल्याचे समोर आले आहे. लाडक्या बहीणी योजनेला पैसै वळवल्यामुळे निधीअभावी राज्यातील होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली आहे. तशा आशयाचं पत्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकुणच मुख्यमत्र्यांच्या लाडक्या बहीण योजनेमुळे राज्यातील होमगार्ड मात्र नावडते झाल्याची मार्मिक टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे वित्त विभागाकडे आलेले अनेक प्रस्ताव पुढे ढकलले जात आहेत किंवा त्याला स्थगिती दिली जात आहे. गृह विभागाने होमगार्ड महासमादेशक यांच्या नावाने दिलेले 1 ऑगस्ट रोजीचे एक पत्र समोर आलं आहे. त्यामध्ये होमगार्डच्या विविध भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव स्थगित करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रस्तावात राज्यातील होमगार्ड सेवेच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्याची वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, युवा, मागास वर्ग आणि समाजातील सर्व दु्र्बल घटकांना आर्थिक मदत व प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यावरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

त्यामुळे विभागाने सादर केलेला प्रस्ताव काही काळासाठी पुढे ढकलण्याबाबत किंवा सद्यःस्थितीत स्थगित ठेवण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे असे अभिप्राय वित्त विभागाने दिले आहेत. सबब, राज्यातील होमगार्ड यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सद्यःस्थितीत स्थगित ठेवण्यात येत आहे. असा शेरा या पत्रात मारण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *