
गौरीच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मुंबईतील दादर मार्केटमध्ये गौरीचे मुखवटे तसेच गौरीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी उसळली होती…
मुंबई: गणरायाच्या आगमनानंतर अडीच दिवसातच म्हणजे भाद्रपद मासातील शुद्ध सप्तमीला गौरीचे घरोघरी आगमन होते. स्थापनेनंतर अडीच दिवसांसाठी माहेराला येणाऱ्या गौरींच्या आगमनासाठी महाराष्ट्रातील बाजापेठा फुलल्या आहेत.
गौरी‑गणपतीच्या काळात घरोघरी गौरींचे पूजन केले जाते. त्याच बरोबर काही कुटुंबांमध्ये घागरी फुंकण्याचीही प्रथा आहे. सध्या महालक्ष्मींच्या मुखवट्यांसह गौरी पूजनाचे साहित्य नागरिक खरेदी करताना आज दिसून आले. महालक्ष्मींचे आकर्षक मुखवटे, त्यांचे सजावटीचे साहित्य याने बाजारपेठ सज्ज झाली आहे. प्रत्येकाकडे परंपरेनुसार गौरीच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काहींकडे उभ्या, काहींकडे बसलेल्या, कुणाकडे तांब्याचे मुखवटे, तर काहींच्या घरी खड्यांच्या महालक्ष्मी स्थापित करण्याची प्रथा आहे. महालक्ष्मींचे मुखवटे विविध प्रकार आकारात विक्रीस उपलब्ध आहेत.
पूर्वी मुखवटे बनवण्यात येणारी वेळखाऊ पद्धत मागे पडली आहे. आधी लोक मातीचे २०० ते ५०० रुपये, प्लास्टर ऑफ पॅरिसचे ४०० ते २,१०० रुपये, पितळेचे २,५०० ते ७,००० रुपयांपर्यंत मुखवटे खरेदी करत असत. आता फायबरच्या फोल्डिंग आकर्षित संपूर्ण साजासहित मूर्ती बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध असून, त्यांच्या खरेदीकडे वाढता कल आहे. यंदा गौरींसाठी मोती, डायमंड, गोल्डन, सिल्व्हर प्रकारातील दागिने बाजारात आले आहेत. मंगळसूत्र ४० ते ४०० रुपयांपर्यंत, लक्ष्मीहार १२५ ते ३५० रुपये, ठुसी २० ते २५० रुपये, एकदाणी ६० ते २५० रुपये, मोहनमाळ २२५ ते ६५० रुपये, कानातले ४० ते २०० रुपये, नथ २० ते १५० रुपये, बिंदिया ५० ते २०० रुपये, बांगड्या ६० ते ३५० रुपये, बाजुबंद ६० ते २०० रुपये, कंबरपट्टा १५० ते ९०० रुपये, मेखला १५० ते ९०० रुपये, तोडे ३५० रुपये असे दागिने उपलब्ध असून, खरेदीसाठी ग्राहकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत.
