नाशिक : अजित दादा आमचे कॅप्टन आहेत. अजित दादांनी शस्त्र खाली ठेवणं योग्य नाही. ते बारामतीतूनच निवडणूक लढवतिल असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल. मीही आता ६५ वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच व्यक्त केलीय. या वक्तव्यामुळे बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याचं संकेत अजित पवारांनी पुन्हा दिलेत यावर छगन भुजबळ यांनी आज भाष्य केले.

अजित पवार यांनी या आधीही ते बारामतीमधून निवडणूक लढणार नाही, असे संकेत दिले होते. यानंतर पुन्हा एकदा त्यांनी तशाच प्रकारचं वक्तव्य केल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे अजित पवार भावनिक राजकारण करत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

दरम्यान, राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. राज्यपालांनी स्वतः लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्याकडून विकासकामे, योजनांची अंमलबजावणी यांसह विविध समस्यांबाबत आढावा घेतला. मात्र राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे मंत्री छगन भुजबळांनी पाठ फिरवली. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की,  मला राज्यपालांच्या दौऱ्याची आधी कल्पना नव्हती. माझ्या मतदारसंघात काही विकासकामांचे उद्घाटन बाकी आहे. आचारसंहिता लागू होण्यासाठी काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे उद्घाटन करण्यासाठी मी मतदारसंघात जात आहे. पण राज्यपाल यांच्याबाबत आदर आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *