गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातही पोलिस सज्ज

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : गणेशोत्सवासंदर्भात पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. शहरात ८० पोलिस अधिकाऱ्यांसह ६०० पोलिस तैनात ठेवले आहेत. याशिवाय सर्व प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातील पुरुष व महिला पोलिसही तैनात आहेत.

भिवंडीचे पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकरी यांनी अतिसंवेदनशील शहरात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे.

१५ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

शहरात १५ हजार ८२६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यात १५९ सार्वजनिक गणपती मूर्ती आणि १५ हजार ६६७ घरगुती विघ्नहर्ता मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. त्यांच्या विसर्जनासाठी महापालिकेने व्यवस्था केली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले. पाच दिवस गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशीच्या गणपतींचे विसर्जन नदीनाका, वरळदेवी तलाव, भादवड, कशेळी, काल्हेरसह ३२ ठिकाणी केले जाणार आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *