विशेष
राजेंद्र साळसकर
हे देवस्थान गणेशाच्या महाराष्ट्रातील एक संपूर्ण शक्तिपीठ (गणपतीचे शक्तिपीठ) आहे. जालना अधिकार भोकरदन हे तीर्थ क्षेत्र आहे. जालन्यापासून २५ किलोमीटर अंतरावर राजुर (राजूर गणपती) गाव आहे.राजुरेश्वर हे एक मार्गटेकडीवरील देवस्थान असून ते दुरून फार सुंदर दिसते. महाराष्ट्रातील गणपतीच्या शक्तीपीठांपैकी हे एक संपूर्ण शक्तिपीठ तसेच नाभीस्थान म्हणून राजूर नावारूपाला आले आहे.पुणे येथे चिंचवडला शिर्षस्थान आहे.तर राजूर गावाला ह्रदयस्थान तर जळगाव,पद्मालय येथे पदस्थान आहे. नवसाला पावणारा अशी राजुरेश्वराची ख्याती आहे.दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी व अंगारी चतुर्थी (अंगारिका चतुु्र्थी) निमित्ताने येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.अंगारिका चतुर्थीला जालना भोकरदन आणि आजूबाजूच्या गावातील लोक दर्शनासाठी पायी चालत येतात.यासह इतर राज्यातील लाखो भाविक आणि नवस पूर्ण करण्यासाठी सामुदायिकपणे राजुरेश्वाला साकडे घालतात.
श्रीक्षेत्र राजूर गणेशाचे महत्व
श्री राजुरेश्वर – राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर.वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता.प्राचीन काळापासून गणेशपुराणात राजूर गणपतीचा उल्लेख आहे.राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती आहे.या ठिकाणाला गड म्हणतात. हा गणपती नवसाच्या समईला पावतो.येथील मूर्तीपुढे अंदाजे सव्वाशे समया रोज तेवत असतात.शेकडो समयातील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात ही मूर्ती फारच विलोभनीय दिसते.पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शु.प्रतिपदेला राजूर,राजापूर येथे आणले म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे ही पर्वणी मानली जाते.सिंदुरासूर राक्षस ऋषिमुनींना त्रास देत होता.त्यामुळे त्याचा नायनाट करण्यासाठी वरण्यराजाने राजुरेश्वराचा अवतार घेतला.सिंदुरासूराचा वध केला व त्याचे अवशेष चारही दिशांना फेकून दिले.त्याचा वध केल्यावर त्याचे अवशेष ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी श्री गणेशाचे साडेतीन पीठे आहेत.त्यापैकी एक राजुरेश्वर देवस्थान आहे.
मराठवाडा ही संतांची भूमी समजली जाते.या भूमीत अनेक संत महंतांनी भक्तीचा फुलवला. अनेक श्रद्धास्थाने असणा-या मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील राजूरचा गणपती हेही असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
जालना जिल्ह्यातील राजूर हे गणपतीचे पूर्ण पीठ मानले जाते.महाराष्ट्रात मोरगाव , चिंचवड व राजूर ही तीन पूर्ण पीठे तर पद्मालय हे अर्ध पीठ मानले जाते.अशा प्रकारची नोंद गणेशपुराणात आढळते.राजूर या गावाची नोंद स्थान पोथीतही आहे.स्थानपोथीतील वर्णनाप्रमाणे राजौरी (सध्याचे राजूर )या गावाच्या पश्चिमेतील एका देवळात चक्रधर स्वामी थांबत असत.
राजुरेश्वर गणेश मंदिराची रचना गर्भगृह,त्यापुढील अंतराळ व सभागृह अशी पूर्वी असावी.हे मंदिर यादवकालिन असल्याचे मानले जाते.सध्या यादवकालिन गाभारा कायम असून पुढील सभागृह नव्याने बांधण्यात आलेले आहे.यादव काळात उंच टेकडीवर असलेल्या या जागेत श्री गणेशाशिवाय शिव व अन्य देवतांच्या मंदिरांचा समुह त्या काळी असावा .
कृष्णाच्या तोंडून म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जुनाने गीता ऐकली ती याच भागात.तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेशगीता सांगीतली.त्यामुळे गाणपत्य सांप्रदायात या स्थानाला फार महत्व आहे.राजा वरण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा महागणपती असे म्हणतात.
पेशव्यांनी नऊ क्विंटलची पंचधातूुंची घंटा दान केली.
इस.सन.१७२२ मध्ये पेशव्यांनी राजुरेश्वरास नऊ क्विंटलची पंचधातुंची घंटा दान केली होती.ती आजही मंदिरात आहे. त्यामुळे राजूरचे महत्व ऐतिहासिक असल्याचे सिद्ध होते.या ठिकाणी विठ्ठल महादेव
मंदीर शेजारी दिपमाळ आहे. अल्लाऊद्दीन खिलजी याने यादवाकडून दौलताबाद किल्ला जिंकला होता.त्यावेळी त्याची नजर राजूर गणपती मंदिरात असलेल्या या उंच दिपमाळ वर पडली व त्याने आपल्या सैन्याला राजूर मंदिरावर आक्रमण करायला व नासधूस करायला सांगितले.ती दिपमाळ आजही तिथे उभी आहे.दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाद्वारे राजुरेश्वराचा जन्मोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते.
श्री गणपती संस्थानने गेल्या दोन वर्षापासून शासनाकडे प्रस्ताव दाखल करून राजुरेश्वर संस्थानला अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. यासाठी रावसाबेब दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.शासनाने एका वर्षात राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणारी ७० ते ८० लाख भाविकांची संख्या तसेच परदेशातून येणारे भाविक लक्षात घेऊन अ वर्ग दर्जा दिला असून त्याचा अधयादेश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने १९ जून रोजी काढला आहे.राजुरेश्वर मंदिराला ऐतिहासिक व पुरातत्वीय पार्श्वभूमी आहे.मंदिराला अ वर्गाचा दर्जा मिळाल्याने स्थानिक भाविक व परदेशातून येणा-या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याने विकास कामाला चालना मिळणार आहे.पर्यायाने आर्थिक उलाढालीत वाढ होऊन राजूरच्या वैभवात भर पडणार आहे.दरम्यान याच परिसरात २० एकरात कृषी पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे .यामुळे शेतरी,विद्यार्थ्यांच्या सहली होणार असून शेतक-यांना प्रशिक्षणही दिेले जाणार आहे.तेथे मुलांसाठी मनोरंजनाचे साहित्य ,वाचनालय राहणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.
श्री राजुरेश्वर गणेश मंदिर जालना शहराच्या उत्तरेला २५ कि.मी.अंतरावर आहे.
विमानाने
जालना शहरामध्ये हवाई सुविधा नाही.सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद शहरातील चिकलथाना येथे आहे.जालना पासून ६४ कि.मी.दूर चिकलथाना विमानतळ ( आयएक्सयू) औरंगाबाद येथे आहे. जालनापासून राजूरसाठी दर तासाला बसची व्यवस्था आहे.
रेल्वेने
देशातून इतर प्रमुख शहरांमधून जालना येथे येण्या – जाण्यासाठी नियमित गाड्या सहजपणे मिळू शकतात. जालना रेल्वे स्थानकापासून राजूरसाठी बसती व्यवस्था आहे.
रस्त्याने
देशातील इतर प्रमुख शहरांमधून जालनापर्यंत नियमित बस आहेत.जालना बस स्थानकापासून राजूरसाठी दर तासाला बसची व्यवस्था आहे.
क्रमश: 👉

